सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कुठे खेळली जाईल, हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानात होणार आहे आणि त्यासाठी भारतीय संघानं पाकिस्तानात यावं, अशी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे. परंतु बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीत भारतीय संघाला पाकिस्तानला पाठवण्यास तयार नाही.
जर भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही, तर आशिया चषक 2023 प्रमाणे पीसीबीला चॅम्पियन्स ट्रॉफी देखील हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित करावी लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी यासाठी तयार असून यासाठी बजेट जवळपास फायनल केल्याची बातमी आहे.
‘क्रिकबज’च्या अहवालानुसार, आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी 65 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 500.5 कोटी रुपयांचं बजेट तयार केलं आहे. पाकिस्तानबाहेर सामने आयोजित केल्यास त्यातून पैसे खर्च होतील, असंही यात नमूद करण्यात आलंय. या 65 दशलक्ष डॉलर्स पैकी 20 दशलक्ष डॉलर्सची बक्षीस रक्कम असेल.
पुढील वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी पाकिस्ताननं तयारी सुरू केली आहे. आयसीसीच्या बैठकीत भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील सहभाग किंवा अनुपस्थिती या महत्त्वाच्या मुद्द्यावर फारशी चर्चा झाली नसली तरी, कोणत्याही परिस्थितीसाठी आकस्मिक योजना तयार करण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 साठी सुमारे 35 दशलक्ष डॉलर्सच्या रक्कमेचं वाटप करण्यात आलं आहे. याशिवाय, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांसाठी आणि बक्षीस रक्कमेसाठी अतिरिक्त 20 दशलक्ष डॉलर्स खर्च करावयाचे आहेत. त्याच वेळी, 15 सामन्यांच्या या स्पर्धेच्या टेलिव्हिजन खर्चासाठी 10 दशलक्ष डॉलर्स मंजूर केले आहेत. आयसीसीनं अधिकृतपणे याची घोषणा केली नसली तरी अहवालात हे नमूद केलं आहे. यावरून असं बोललं जातंय की, भारताचे सामने पाकिस्तानबाहेर आयोजित केले जातील. अशा परिस्थितीत दुबई आघाडीवर आहे.
अहवालानुसार, पीसीबीनं यजमान करारावर स्वाक्षरी केली आहे आणि मॅनेजमेंटच्या सहकार्यानं कार्यक्रमाचं बजेट तयार केलं आहे. याशिवाय काही सामने पाकिस्तानबाहेर खेळवायचे असल्यास स्पर्धेच्या आयोजनाच्या खर्चात वाढ करण्यासही मान्यता दिली आहे. यावरून हे स्पष्ट आहे की, आयसीसीनं प्लॅन बी तयार केला आहे की, जर काही सामने पाकिस्तानबाहेर आयोजित केले गेले तर त्याचा खर्च आयसीसी उचलेल.
हेही वाचा –
भारत-श्रीलंका सामन्यात सुपर ओव्हर व्हायला हवी होती, आयसीसीचा नवा नियम अंपायर विसरलेत का?
IND VS SL: दुसऱ्या वनडेपूर्वी संघाला मोठा, स्टार ऑलराउंडर दुखापतीमुळे मालिकेबाहेर
रुममध्ये एसी नाही, भारतीय खेळाडू गर्मीनं हैराण; केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल