भारताने अलीकडेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु आता भारताच्या आशांना मोठा धक्का बसताना दिसत आहे. प्रत्यक्षात, अशी बातमी समोर आले आहे की, आयसीसीने पुढील तीन आवृत्त्यांसाठी इंग्लंडला यजमानपद देण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसी जुलैमध्ये होणाऱ्या वार्षिक परिषदेत ही अधिकृत घोषणा करू शकते. आतापर्यंत इंग्लंडने जागतिक कसोटी क्रिकेट परिषदेच्या तीन अंतिम सामन्यांचे आयोजन केले आहे. तिसरा अंतिम सामना सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जात आहे, ज्याला क्रिकेटचा मक्का म्हटले जाते. यापूर्वी, भारताने 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) एक करार अंतिम करणार आहे ज्यामुळे 2031 पर्यंत चालणाऱ्या पुढील तीन आवृत्त्यांसाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) अंतिम सामन्याचे आयोजन करण्याची परवानगी मिळेल. द टेलिग्राफच्या मते, आयसीसी जुलैमध्ये होणाऱ्या वार्षिक परिषदेत इंग्लंडच्या यजमानपदाच्या अधिकारांची पुष्टी करेल अशी अपेक्षा आहे.
अहवालात म्हटले आहे की, ईसीबीला आयसीसीकडून तोंडी पुष्टी मिळाली आहे. भारताने डब्ल्यूटीसी फायनलचे आयोजन करण्यास रस दाखवला होता. अलिकडच्या अनेक आयसीसी बैठकांमध्ये या विषयावर चर्चा झाली होती. तथापि, तटस्थ कसोटी सामन्यांसाठीही मोठ्या संख्येने प्रेक्षकांना आकर्षित करण्याची क्षमता असलेल्या इंग्लंडला पसंती मिळाली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या डब्ल्यूटीसी 2025 च्या अंतिम सामन्यात मैदानावर क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी दिसून आली आहे.
या नवीन करारामुळे, इंग्लंड डब्ल्यूटीसीच्या पहिल्या सहा अंतिम सामन्यांचे आयोजन करण्यास सज्ज आहे. इंग्लंडमध्ये डब्ल्यूटीसी फायनल आयोजित करण्याची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे यजमान संघ अंतिम फेरीत नसतानाही चाहते सामना पाहण्यासाठी मैदानावर पोहोचतात. याशिवाय, जूनच्या विंडोमध्ये यजमानपदासाठी इंग्लंडपेक्षा चांगले हवामान नाही.






