सध्या भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ सातत्याने खेळताना दिसतोय. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाने टी२० मालिका खेळली. त्यानंतर आयर्लंड व इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ खेळला. २२ जुलैपासून भारतीय संघ वेस्ट इंडीजमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका व त्यानंतर ५ सामन्यांची टी२० मालिका खेळेल. पुढे आशिया चषक व विश्वचषक येणार आहे. या मधल्या काळात भारतीय संघाच्या वेळापत्रकात आणखी बदल झाला असून दोन मोठ्या संघांविरुद्ध रोहित शर्मा आणि टीम इंडिया खेळताना दिसेल.
सध्या भारतीय संघाचे पूर्ण लक्ष ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकावर आहे. तत्पूर्वी, अधिकाधिक टी२० सामने खेळण्याचा भारतीय संघ प्रयत्न करतोय. त्यासाठीच आशिया चषक टी२० प्रकारात खेळला जाईल. मात्र, आशिया चषकानंतर भारतीय संघ आणखी दोन मजबूत संघांशी भिडेल. हे दोन्ही संघ अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी२० सामने खेळले जाणार आहेत. हे सामने अनुक्रमे २०, २३ आणि २५ सप्टेंबर रोजी मोहाली, नागपूर आणि हैदराबाद येथे खेळवले जातील. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत तिरुअनंतपुरम, गुवाहाटी आणि इंदूर येथे टी२० सामने पार पडतील. त्यानंतर ६ ते ११ ऑक्टोबर दरम्यान रांची, लखनऊ आणि दिल्ली येथे वनडे सामने होतील.
टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पहिल्या पसंतीचे भारतीय खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आपापल्या दुय्यम दर्जाच्या संघांना मैदानात उतरवू शकतात. भारतीय संघ मागील काही काळापासून सातत्याने अनेक खेळाडूंना संधी देत आहे. याचा उद्देश भारतीय क्रिकेटची दुसरी फळी निर्माण करणे आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
‘शार्दुल ठाकुरकडे हार्दिक पंड्याएवढी क्षमता नाहीये…’, माजी दिग्गजाची प्रतिक्रिया चर्चेत
सोनियाचा दिनु! इंग्लंडमधील ऐतिहासिक स्टेडियमला दिले जाणार मुंबईकराचे नाव