यजमान इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील नॉटिंघम येथील पहिला सामना अनिर्णीत राहिला. भारतीय संघाला या सामन्यात विजयाची संधी होती. मात्र, पावसामुळे अखेरच्या दिवसाचा खेळ न झाल्याने भारत विजय मिळवू शकला नाही. या सामन्यांमध्ये पाहुण्या भारतीय संघाने वर्चस्व गाजवले होते. उभय संघांमधील दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला वेस्ट इंडीजचे दिग्गज वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी या मालिकेत विजयी होऊ शकणाऱ्या संघाची भविष्यवाणी केली.
हा संघ सहजरीत्या मालिका आपल्या नावे करेल
कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी मालिका जिंकू शकणाऱ्या संघाचे नाव सांगितले. ते म्हणाले, “भारताने या मालिकेला विजयाचा दावेदार म्हणून सुरुवात केली. अजूनही तेच प्रमुख दावेदार असून ते सहजरीत्या मालिका जिंकतील. भारत मालिका न जिंकण्याचे मला एकही कारण दिसत नाही. त्यांनी येथील परिस्थितीशी चांगले जुळवून घेतले आहे. त्यांनी कोणत्याही निकालाची अपेक्षा न करता आपला नैसर्गिक खेळ सुरू ठेवावा. भारताचा संघ युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीमुळे मजबूत भासतो.”
होल्डिंग यांच्यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन, भारताचे दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर व इतरही अनेक दिग्गजांनी भारताला या मालिकेत विजयाची संधी असल्याचे म्हटले आहे.
असा राहिला पहिला सामना
नॉटिंघम येथील पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या १८३ धावांवर संपला. यानंतर, भारताने पहिल्या डावात २७८ धावा केल्या. इंग्लंडने कर्णधार जो रूटच्या शतकाच्या बळावर दुसऱ्या डावात ३०३ धावांची मजल मारली आणि भारतासमोर विजयासाठी २०९ धावांचे आव्हान ठेवले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने एक गडी गमावून ५२ धावा केल्या होत्या. अखेरच्या दिवशी भारत विजयाचा दावेदार होता. शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती. मात्र, पावसामुळे एकही चेंडू न टाकला गेल्याने भारत विजय मिळवू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: लॉर्ड्स कसोटीतून शार्दुल ठाकूर भारतीय संघातून बाहेर, ‘हे’ आहे कारण