इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील नॉटिंघम येथील पहिला सामना अनिर्णीत राहिला. भारतीय संघाला या सामन्यात विजयाची संधी होती. मात्र, पावसामुळे अखेरच्या दिवसाचा खेळ न झाल्याने भारत विजय मिळवू शकला नाही. मालिकेतील दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघांला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर हा दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल.
पहिल्या सामन्यात केलेली शानदार कामगिरी
भारतीय संघातील तळाच्या खेळाडूंनी फलंदाजीत योगदान द्यावे म्हणून, ट्रेंट ब्रिज येथील पहिल्या कसोटीत सामन्यात संघ व्यवस्थापनाने शार्दुल ठाकूर याला संधी दिली होती. पहिल्या डावात फलंदाजी योगदान देऊ शकला नसला तरी, दोन्ही डावात प्रत्येकी दोन बळी मिळवत त्याने चमकदार कामगिरी केलेली. पहिल्या डावात जो रूट व ओली रॉबिन्सनला बाद करत त्याने इंग्लंडचा डाव १८३ धावांवर गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तर दुसर्या डावात त्याने जोस बटलर व डॅन लॉरेन्सला तंबूचा रस्ता दाखवलेला.
दुसऱ्या कसोटीतून बाहेर शार्दुल
गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) लॉर्ड्स येथे सुरू होणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शार्दुल ठाकूर खेळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. मंगळवारी झालेल्या पहिल्या सराव सत्रात त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला होता. भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल व ट्रेनर निक वेब हे त्याच्यावर लक्ष ठेवून होते. मात्र, सामन्याच्या पूर्वसंध्येला तो खेळणार नसल्याचे निश्चित झाले.
या खेळाडूला मिळू शकते संधी
शार्दुल दुखापतग्रस्त झाल्याने लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघ व्यवस्थापनाकडून अनुभवी इशांत शर्माला संधी देण्यात येऊ शकते. संघाच्या पहिल्या सराव सत्रात त्याने सर्वाधिक वेळ नेट्समध्ये घालवला होता. लॉर्ड्सची खेळपट्टी स्विंग गोलंदाजांना अनुकूल असल्याने उमेश यादव यालादेखील संघात सहभागी केले जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
बंगालचे क्रिकेटर घेतायेत आर्मीकडून प्रशिक्षण, प्रशिक्षकाने सांगितले कारण
पाकिस्तानचे पानिपत करणारा ‘तो’ गोलंदाज लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडच्या ताफ्यात