एकीकडे भारत विरुद्ध न्यूझीलंड पुरुष संघात कसोटी मालिका सुरू आहे. दुसरीकडे भारत आणि न्यूझीलंड महिला संघात आजपासून (24 ऑक्टोबर) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथे खेळला गेला असून भारतीय महिला संघाने 59 धावांनी हा सामना जिंकला. या विजयासह भारतीय महिला संघाने वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने कर्णधार स्म्रीती मंधानाच्या नेतृत्त्वाखाली नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना तेजल हसबनीस आणि दीप्ती शर्मा यांच्या खेळींच्या जोरावर भारतीय संघाने 227 धावा जमवल्या. तेजलने 64 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. तर दीप्तीने 51 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 41 धावांची खेळी केली.
न्यूझीलंडची गोलंदाज अमेलिया केरने 9 षटकांत 42 धावा देत भारताच्या 4 फलंदाजांना बाद केले. तसेच जेस केरने 49 धावा देत 3 विकेट्स काढल्या. या दोघींच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ 44.3 षटकांतच 227 धावांवर गुंडाळला गेला.
प्रत्युत्तरात भारताच्या गोलंदाजांनीही शानदार प्रदर्शन करत न्यूझीलंडला 41 षटकांतच सर्वबाद केले. 40.4 षटकांत केवळ 168 धावांवर न्यूझीलंड संघ सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून फक्त ब्रूक हलीदे 39 धावांची सर्वात मोठी खेळी करू शकली. इतर फलंदाजांना विशेष फलंदाजी करता आली नाही. भारतीय गोलंदाज राधा यादवने 8.4 षटकांत 35 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. तसेच साईमा ठाकोरने 2 विकेट्स आणि दीप्ती शर्मा व अरुंधती रेड्डीने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
कर्णधार सोफी डिवाईन दीप्ती शर्मा आणि यस्तिका भाटियाच्या हातून 2 धावांवर धावबाद झाली. तर मॅडी ग्रीनलाही स्म्रीतीने धावबाद केले. ती 31 धावा करू शकली.
या विजयासह भारताने न्यूझीलंडसोबतचा टी20 विश्वचषकातील हिशोब चुकता केला आहे. नुकत्याच संपलेल्या महिला टी20 विश्वचषक 2024मध्ये न्यूझीलंड विजेता बनला, तर टीम इंडियाला बाद फेरीतही प्रवेश करता आला नाही. खरं तर, ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून 58 धावांनी पराभव झाला होता आणि नंतर हा पराभव टीम इंडियासाठी महागडा ठरला.
आता उभय संघातील दुसरा वनडे सामना 27 ऑक्टोबरला अहमदाबादच्या मैदानावर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सरफराज खानने आक्रमकपणे कर्णधार रोहितला डीआरएस घेण्यासाठी मनवले आणि नंतर… Video
गंभीर-रोहितमध्ये कॉमनसेन्स नाही, माजी खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य
IND vs NZ; ‘या’ स्टार खेळाडूचा जलवा पाहून गावसकरांनी फिरवले शब्द, म्हणाले…