ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिला टी२० विश्वचषकात भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची भारतीय महिला संघाची ही पहिलीच वेळ आहे.
या विश्वचषकात आज(५ मार्च) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पहिला उपांत्य सामना रंगणार होता. मात्र या सामन्याआधीपासून सिडनीमध्ये पाऊस सुरु होता. त्यामुळे हा सामना नाणेफेकही न होता रद्द झाला आहे.
त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार साखळी फेरीनंतर अ गटात अव्वल क्रमांकावर असणाऱ्या भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
महिला टी२० विश्वचषकाचा हा ७ वा हंगाम आहे. याआधी झालेल्या सर्व ६ टी२० विश्वचषकात भारतीय संघ खेळला आहे. मात्र भारताला आत्तापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही. भारताने याआधी २००९, २०१० आणि २०१८ या टी२० विश्वचषकामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र तिन्ही वेळेस भारतीय संघ उपांत्य सामन्यात पराभूत झाला होता.
तसेच २०१२, २०१४ आणि २०१६ या तीन टी२० विश्वचषकात भारतीय महिला संघाचे साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आले होते. त्यानंतर आता भारताने पहिल्यांदाच महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे भारताला हा विश्वचषक जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे.
आत्तापर्यंत सर्वाधिकवेळा ऑस्ट्रेलिया संघाने महिला टी२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे. त्यांनी २०१०, २०१२, २०१४ आणि २०१८ असे ४ विश्वचषक जिंकले आहेत. तर २००९ ला इंग्लंड महिला संघाने आणि २०१६ ला वेस्ट इंडीज महिला संघाचे हा विश्वचषक जिंकला आहे.
भारतीय महिला संघाची टी२० विश्वचषकातील कामगिरी –
२००९ – उपांत्य सामना (न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध पराभव)
२०१० – उपांत्य सामना (ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध पराभव)
२०१२ – साखळी फेरीत आव्हान संपुष्टात
२०१४ – ५ वे स्थान
२०१६ – साखळी फेरीत आव्हान संपुष्टात
२०१८ – उपांत्य सामना (इंग्लंड महिला संघाविरुद्ध पराभव)
२०२० – अंतिम सामना
महत्त्वाच्या बातम्या-
–इतिहास घडला! टीम इंडिया पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाच्या फायनल
–मोठ मोठे क्रिकेटपटूही विचारात पडले पण कारनामा तर पोलार्डने केला
–रोहित-कोहलीसह भारतीय क्रिकेटपटूंचे करियर आता या माजी खेळाडूच्या हाती