---Advertisement---

“आळशी आहे टीम इंडिया, कशी जिंकणार वर्ल्डकप”, माजी कॅप्टनचे खळबळजनक भाष्य

On: गुरूवार, फेब्रुवारी 13, 2020 5:16 PM
---Advertisement---

21 फेब्रुवारीपासून आयसीसी महिला टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकाआधी भारतीय महिला संघाने चूकांमधून शिकायला हवे, तरच आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवता येईल, असे मत भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडुलजी यांनी मांडले आहे.

बुधवारी महिला तिरंगी टी20 मालिकेत भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात 11 धावांनी पराभूत व्हावे लागले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर 155 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला सर्वबाद 144 धावाच करता आल्या. विशेष म्हणजे एकावेळी भारतीय संघ 3 बाद 115 धावा अशा भक्कम स्थितीत होता.

त्यामुळे या पराभवानंतर पीटीआने दिलेल्या वृत्तानुसार एडुलजी म्हणाल्या, ‘या संघाबाबत काहीतरी चूकीचे होत आहे. हा संघ सर्व सामने जिंकू शकतो आणि बिकट परिस्थितीतही या संघाने विजय मिळवला आहे. पण पुढच्याच सामन्यात विजयाच्या जवळ जाऊन हा संघ पराभूत होतो. त्यांची सातत्यपूर्ण कामगिरी नाही.’

तसेच एडुलजी पुढे म्हणाल्या, ‘आता महिला संघाकडे पुरुष संघाप्रमाणे सर्व सुविधा आहेत. तरीही महिला संघ सातत्यपूर्ण कामगिरी करु शकत नाही. जर त्या आत्ता खेळत आहेत, तशाच खेळत राहिल्या तर त्या पून्हा एकदा उपांत्य फेरीपर्यंत (टी20 विश्वचषकात) पोहचू तर शकतील पण विजेतेपद मिळवू शकत नाही.’

2018 ला झालेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याआधी 2017 ला झालेल्या महिला वनडे विश्वचषकात भारतीय संघ अंतिम सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाला होता.

त्याचबरोबर एडुलजी म्हणाल्या की एकेरी दुहेरी धावांची आणि योग्य शॉट्सची निवड करता आली पाहिजे. त्या म्हणाल्या, ‘त्या (महिला संघ) आळशी आहेत की त्यांनी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाही. या गोष्टींमुळे खूप फरक पडतो. हे असे आहे की एक धाव घ्या किंवा बाउंड्री मारा, यापलीकडे काही नाही.’

20 कसोटी आणि 36 वनडे सामने खेळलेल्या एडुलजी यांनी जेमिमाह रोड्रिगेज आणि टी20 कर्णधार हरमनप्रीत कौर यांनीही सातत्यपूर्ण कामगिरी करायला हवी असे म्हटले आहे.

64 वर्षीय एडुलजी म्हणाल्या, ‘हरमनप्रीत आणि जेमिमाहने जबाबदारी घ्यायला हवी. कदाचित हरमनप्रीतने कर्णधारपद सोडून तिचा नैसर्गिक खेळ केला पाहिले. कधीकधी कर्णधारपद तिला सतावत असल्यासारखे वाटते. पण मग ही जबाबदारी कोण घेणार, जर स्म्रीतीला कर्णधारपद दिले तर कदाचीत तिच्याही फलंदाजीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.’

तसेच गोलंदाजीच्या फळीबद्दल बोलताना एडुलजी म्हणाल्या, ‘असे वाटत आहे की देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगले वेगवान गोलंदाज नाही. शिखा पांडे सोडून इतर कोण आहे? वेगवान गोलंदाज कसे तयार करायचे, ज्युनियर क्रिकेटकडे आपण लक्ष दिले पाहिजे.’

एडुलजी असेही म्हणाल्या की ‘मानसिकदृष्ट्या बळकट होण्यासाठी संघाला विशेष सत्रांमध्येही भाग घ्यावा लागेल. या क्षणी ते केवळ उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरी गाठू शकतात. विजेतेपद जिंकण्यासाठी आणखी काही प्रयत्न करावे लागेल.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---