अहमदाबाद। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रविवारपासून (६ फेब्रुवारी) ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केल्यानंतर फलंदाजांनी १७७ धावांचे आव्हान संयमितपणे पार करत ६ गडी राखून विजय मिळवला. भारतीय संघाचा हा १००० वा वनडे सामना होता.
भारतीय संघाची अप्रतिम गोलंदाजी
अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी लाजवाब कामगिरी केली. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी करताना वेस्ट इंडीजला अवघ्या १७६ धावांवर सर्वबाद केले. भारतासाठी चहलने सर्वाधिक ४ तर अष्टपैलू वाशिंग्टन सुंदर याने तीन बळी टिपले. वेस्ट इंडीजसाठी जेसन होल्डरने अर्धशतक ठोकून एकाकी झुंज दिली.
पाहुण्या संघाने दिलेले १७७ धावांचे आव्हान पार करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्मा व ईशान किशन यांनी पहिल्या गड्यासाठी ८४ धावांची भागीदारी केली. अल्झारी जोसेफने रोहित शर्माला बाद करत ही जोडी फोडली. रोहितने ६० धावा बनविल्या.
त्यानंतर आलेला विराट कोहली फार काळ टिकू शकला नाही. पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार वसूल करत त्याने चांगली सुरुवात केली. मात्र, चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात तो झेलबाद झाला. पहिल्यापासून तात पडत असलेला ईशान किशनही तंबूत परतला. तर, रिषभ पंत दुर्दैवीरित्या केवळ ११ धावा बनवून धावबाद झाला.
त्यानंतर सूर्यकुमार यादव व पदार्पण करणारा दीपक हूडा ही जोडी जमली. त्यांनी अजिबात जोखीम न पत्करता संघाला विजयाच्या दिशेने नेले. दोघांनी पाचव्या गड्यासाठी नाबाद ६२ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. युजवेंद्र चहल याला आपल्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मालिकेतील दुसरा सामना याच मैदानावर ९ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
नशीबाचा खेळ! कधीही विश्वचषकात न खेळलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणने अखेर चाखली विश्वविजयाची चव