कोलकाता| ईडन गार्डन येथे बुधवारी (१६ फेब्रुवारी) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना झाला. यजमान भारतीय संघाने ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला आहे. यासह भारतीय संघाने टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी भारताने वेस्ट इंडिजला वनडे मालिकेत ३-० ने क्लिन स्वीप केले होते.
वेस्ट इंडिजच्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने कर्णधार खेळी केली. त्याने १९ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने झंझावाती ४० धावा केल्या. त्याच्या साथीला सलामीवीर इशान किशनने ३५ धावा जोडल्या. तर सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू वेंकटेश अय्यर यांनी अंतिम षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. सूर्यकुमार ३४ धावांवर नाबाद राहिला. तर वेंकटेश अय्यरने नाबाद २४ धावा केल्या.
वेस्ट इंडिजकडून या डावात रोस्टन चेसने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर फॅबियन ऍलेन आणि शेल्डन कॉट्रेल यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
Venkatesh Iyer hits the winning runs for #TeamIndia as we win by 6 wickets.@Paytm #INDvWI pic.twitter.com/aaE7FUOR9J
— BCCI (@BCCI) February 16, 2022
तत्पूर्वी वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ७ बाद १५७ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून यष्टीरक्षक निकोलस पूरन याने झंझावाती अर्धशतकी खेळी केली होती. त्याने ४३ चेंडूंचा सामना करताना ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त वेस्ट इंडिजचा एकही फलंदाज ५० धावा करू शकला नाही. सलामीवीर कायले मेयर्सने ३१ धावांचे योगदान दिले. तर कर्णधार कायरन पोलार्ड २४ धावांवर नाबाद राहिला.
भारताकडून या डावात पदार्पणवीर रवी बिश्नोई याने स्वप्नवत कामगिरी केली. त्याने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना केवळ १७ धावा देत २ विकेट्स काढल्या. हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. बिश्नोईबरोबरच हर्षल पटेलने २ विकेट्स घेतल्या. तसेच दीपक चाहर, अनुभवी युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा काय झेल आहे! रोहितने कसला भारी कॅच घेतला, बाजूला उभा असलेला सूर्यकुमारही बघतच राहिला
क्या बात! पदार्पणातच रवी बिश्नोईने मोडला सचिनचा तब्बल १६ वर्ष जुना विक्रम
‘केकेआरचे नेतृत्त्व करण्यास मी उत्सुक’, कर्णधार श्रेयस अय्यरची पहिली प्रतिक्रिया; वाचा सविस्तर