यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने आयपीएल २०२० च्या अगदी आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले. धोनी गेल्या एक वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. पण धोनी अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. परंतु, चाहत्यांसाठी खुशखबर अशी आहे की, पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात धोनी खेळणार आहे. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असेल.
डिसेंबर २००४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीने आपल्या १६ वर्षाच्या कारकीर्दीत अनेक चढउतार पाहिलेत. त्याने ५३८ आंतरराष्ट्रीय (३५० एकदिवसीय, ९० कसोटी, ९८ टी-२०) सामने खेळले. यामध्ये त्याने वनडे सामन्यात १०७७३, कसोटी सामन्यात ४८७६ आणि टी-२० सामन्यात १६१७ धावांसह एकूण १७२६६ धावा केल्या आहेत. त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीची सरासरी ४४.९६ होती तर स्ट्राइक रेट ७९.०७ होता. या दरम्यान त्याने १६ शतके आणि १०८ अर्धशतके झळकावली. त्याची सर्वोत्तम धावसंख्या २२४ धावा होती.
यष्ट्यांच्या मागे एकूण ८२९ शिकार
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्ट्यांमागे एकूण ८२९ बळी घेतले आहेत. ज्यात त्याने कसोटीमध्ये २५६ झेल घेतले आणि ३८ यष्टीचीत केले. वनडे सामन्यात ३२१ झेल घेतले तर १२३ यष्टीचीत केले. तसेच टी-२० सामन्यात ५७ झेल घेतले आणि ३४ यष्टीचीत केले. एकूणच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६३४ झेल आणि १९५ यष्टीचीत केले.
एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने जिंकल्या या ट्रॉफी-
२००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वात विजेतेपद फाटकावले. २००८ मध्ये ऑलेस्ट्रेलियामध्ये सीबी वनडे मालिका जिंकली, २००९ मध्ये कॉम्पॅक चषक विजेता, २०१० मध्ये आशिया चषक जिंकला, २०११ मध्ये वनडे विश्वचषक जिंकून एक इतिहास रचला, २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१३ मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आणि २०१६ मध्ये टी-२० आशिया चषक जिंकला आहे.