विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आता अवघे ३ दिवस बाकी आहेत. १८ ते २२ जून दरम्यान हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली.
‘या’ खेळाडूंना संधी
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी जाहीर झालेल्या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना संधी मिळाली असून केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे रोहित आणि शुभमनचीच जोडी अंतिम सामन्यात सलामीला उतरणार हे निश्चित आहे. मधल्या फळीत कोहली आणि रहाणे व्यतिरिक्त चेतेश्वर पुजाराचा समावेश आहे. तर अतिरिक्त फलंदाज म्हणून हनुमा विहारीला संधी मिळाली आहे.
यष्टीरक्षक म्हणून या संघात रिषभ पंत आणि वृद्धिमान सहा यांना स्थान मिळाले आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या जागी रवींद्र जडेजाला स्थान मिळाले आहे. या संघात विशेषज्ञ फिरकीपटू म्हणून केवळ आर अश्विनचा समावेश आहे. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांना वगळण्यात आले आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. तर त्यांच्या साथीला मोहम्मद सिराज आणि उमेश यादवला स्थान देण्यात आले आहे.
https://twitter.com/BCCI/status/1404785767700996096
१५ सदस्यीय भारतीय संघ- रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान सहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज.