टी-20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026) ची सुरुवात 7 फेब्रुवारी पासून होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. आगामी विश्वचषकासाठी सर्व देश आपले संघ जाहीर करत आहेत. आता अशा एका देशाने आपला संघ जाहीर केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकत्र खेळताना दिसतील. तसेच, या संघाचे नेतृत्व भारतीय वंशाच्या खेळाडूकडे सोपवण्यात आले आहे.
येथे आपण USA म्हणजेच अमेरिका क्रिकेट संघाबद्दल बोलत आहोत.
2024 मध्ये पहिल्यांदा टी-20 विश्वचषकाचा भाग बनलेल्या अमेरिकन संघाने 2026 च्या विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या संघात बहुतांश खेळाडू भारतीय वंशाचे आहेत. याशिवाय पाकिस्तान आणि श्रीलंकन वंशाच्या खेळाडूंचाही यात समावेश आहे.
यूएसएने पुन्हा एकदा विश्वचषकासाठी भारतीय वंशाच्या मोनांक पटेल (Monank Patel) याच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. 2024 च्या स्पर्धेत खेळलेल्या 10 खेळाडूंनी या संघात पुनरागमन केले आहे. अमेरिकेसाठी हा दुसरा टी-20 वर्ल्ड कप असेल. या स्पर्धेत अमेरिकेला ग्रुप-ए मध्ये भारत, पाकिस्तान, नामीबिया आणि नेदरलँड सोबत ठेवण्यात आले आहे. अमेरिकेला साखळी फेरीत चार सामने खेळायचे आहेत, ज्यापैकी तीन सामने भारतात आणि एक श्रीलंकेत होईल.
टी-20 वर्ल्ड कपसाठी USA चा संघ (Squad): मोनांक पटेल (कर्णधार), जेसी सिंग, अँड्रीज गौस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शायान जहांगीर, सैतेजा मुक्कमाला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंग, नोस्थुश केनजिगे, शॅडली वान शल्कविक, सौरभ नेत्रावळकर, अली खान, मोहम्मद मोहसीन, शुभम रांजणे.
टी-20 वर्ल्ड कपमधील USA चे वेळापत्रक (लीग स्टेज)
7 फेब्रुवारी: भारत विरुद्ध अमेरिका, मुंबई
10 फेब्रुवारी: पाकिस्तान विरुद्ध अमेरिका, कोलंबो
13 फेब्रुवारी: नेदरलँड्स विरुद्ध अमेरिका, चेन्नई
15 फेब्रुवारी: नामीबिया विरुद्ध अमेरिका, चेन्नई






