पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत 6 पदकं जिंकली आहेत. यामध्ये 5 कांस्य आणि एका रौप्य पदकाचा समावेश आहे. यंदा नेमबाजीतून भारताला 3 पदकं मिळाली, तर हॉकी, कुस्ती आणि भालाफेकीत एक-एक पदक मिळालं.
तसं पाहिलं तर, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या आणखी जास्त राहिली असती. किंबहुना, भारत प्रथमच एका ऑलिम्पिकमध्ये पदकांचा दुहेरी आकडाही गाठू शकला असता. मात्र काही भारतीय खेळाडूंचं पदक अगदी थोड्या फरकानं हुकलं. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा भारतीय खेळाडूंची माहिती देणार आहोत.
मीराबाई चानू : टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूकडून यंदा देखील पदकाची अपेक्षा होती. मात्र ती 49 किलो वजनी गटात चौथ्या स्थानी राहिली. मीराबाईनं स्नॅच राउंडमध्ये चांगली कामगिरी केली होती. ती तिसऱ्या स्थानी राहिली होती. मात्र क्लिन अँड जर्क मध्ये तिच्या हाती निराशा आली. ती आपल्या शेवटच्या प्रयत्नात 114 किलो वजन उचलू शकली नाही.
मनू भाकर : स्टार नेमबाज मनू भाकरकडे पदकांची हॅट्रिक लगावण्याचा गोल्डन चान्स होता. तिनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि मिश्र इव्हेंटमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. मात्र 25 मीटर पिस्तूल इव्हेंटमध्ये ती चौथ्या स्थानी राहिली. एकावेळी ती पदक जिंकण्याच्या शर्यतीत होती, मात्र शूटऑफमध्ये तिचा पराभव झाला.
अर्जुन बाबुता : 10 मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये एकवेळ रौप्य पदकाची दावेदारी ठोकणारा अर्जुन बाबुता पॅरिसमधून रिकाम्या हातानं परतला. तो पहिल्या 11 राउंडनंतर दुसऱ्या स्थानी होता. 1-2 चांगले शॉट्स त्याला सुवर्ण देऊ शकले असते, मात्र त्यानं सलग 3 खराब शॉट मारले ज्यामुळे त्याला कांस्यपदकही मिळालं नाही.
धीरज-अंकिता : भारताची तीरंदाजी जोडी धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भकत यांचं पदक देखील थोडक्यात हुकलं. त्यांना कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या कॅसी कॉफहोल्ड आणि ब्रॅडी एलिसन यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला.
महेश्वरी-अनंतजीत : महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह नरुका यांच्या जोडीला स्कीट मिक्स टीम स्पर्धेच्या कांस्यपदकाच्या सामन्यात अवघ्या एका अंकानं पराभव पत्कारावा लागला. या जोडीला चीनच्या संघानं 43-44 असं पराभूत केलं.
लक्ष्य सेन : स्टार बॅडमिंटन खेळाडू लक्ष्य सेनकडे इतिहास रचण्याची उत्तम संधी होती. मात्र सेमीफायनल आणि कांस्यपदकाच्या सामन्यात तो आघाडी घेऊन पराभूत झाला. लक्ष्यनं जर पदक जिंकलं असतं, तर तो बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू बनला असता.
हेही वाचा –
‘ट्रान्सजेंडर’ इमान खलीफनं जिंकलं सुवर्णपदक; महिला असण्याबद्दल झाले होते प्रश्न उपस्थित
“जिममध्ये रात्रभर जॉगिंग केलं…”, कांस्यपदक सामन्यापूर्वी अमनने चक्क इतके किलो वजन घटवले
वयाच्या 10 व्या वर्षी अनाथ, स्टेडियमच घर! पाहा अमन सेहरावताचा ऑलिम्पिक पदकाचा संघर्षमयी प्रवास