क्रिकेटमध्ये कोणताही फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झाला की तो स्वत: ला सर्वात वाईट समजतो. तसेच, जर तो सामन्याचा पहिलाच चेंडू असेल, तर संघाची यापेक्षा वाईट सुरुवात काय असेल याचा विचार करा. वनडे सामन्यात आतापर्यंत असे बरेच फलंदाज झाले, जे सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाले आणि आल्या पाऊली माघारी परतले.
वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत पहिल्यांदा फलंदाजी करताना ७३ वेळा फलंदाज सामन्याच्या पहिल्या चेंडूवर बाद झाले आहेत. त्यापैकी ५ वेळा भारतीय फलंदाज सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झालेत. याखेरीज सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करताना बोलायचे झाले, तर आतापर्यंत पहिल्याच चेंडूवर ६० वेळा फलंदाज बाद झाले असून त्यात ४ भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. वनडे सामन्याच्या पहिल्या चेंडूवर बाद झालेला पहिला फलंदाज इंग्लंडचा बॅरी वूड (Barry Wood) होता, त्याला १९७६ मध्ये अँडी रॉबर्ट्सने (Andy Roberts) बाद केले होते.
वनडे सामन्यात डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद होण्याचा विक्रम हा ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर आहे, त्याने आतापर्यंत वनडे सामान्यांच्या दोन्ही डावांत मिळून ६ वेळा सामन्याच्या पहिल्या चेंडूवर बाद होण्याचा विक्रम केला आहे. गोलंदाजांपैकी चामिंडा वासने (Chaminda Vaas) सामन्याच्या पहिल्या चेंडूवर ५ फलंदाजांना सर्वाधिक वेळा पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. भारताकडून हा विक्रम झहीर खानच्या नावावर आहे. त्याने ४ वेळा फलंदाजांना सामन्याच्या पहिल्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.
वनडे सामन्यात डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झालेल्या भारतीय फलंदाजांवर नजर टाकूया-
१. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)
१९८० मध्ये खेळल्या गेलेल्या बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड सिरीजच्या पाचव्या सामन्यात सुनील गावस्कर पहिल्याच चेंडूवर रिचर्ड हॅडलीच्या (Richard Hadlee) गोलंदाजीचा शिकार झाले. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात रिचर्ड हॅडलीने (५/३२) अशी सर्वोत्कृष्ट कामगिरी करूनही भारताने (१६२ धावा) न्यूझीलंडला (१५७धावा) ५ धावांनी पराभूत केले होते.
२. रवी शास्त्री (Ravi Shastri)
१९८५ मध्ये शारजा येथे खेळल्या गेलेल्या रॉथमैंस कप (Rothmans Cup) मधील पहिल्या सामन्यात इम्रान खानने (Imran Khan) सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर भारतीय सलामीवीर रवी शास्त्रीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इम्रान खानच्या (६/१४) शानदार गोलंदाजीनंतरही भारताने (१२५) कमी धावा असूनही पाकिस्तानला (८७) ३८ धावांनी पराभूत केले.
३. सौरव गांगुली (Sourav Ganguly)
१९९७ मध्ये “इंडिपेंडेंस चषकातील” चौथ्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर सौरव गांगुली चामिंडा वासने बाद केले. मुंबईत भारतीय संघाने २२५/७ धावा केल्या. त्याचे प्रतिउत्तरादाखल श्रीलंकेने सनथ जयसूर्याच्या नाबाद १५१ धावांच्या मदतीने ४१ व्या षटकात ५ गडी गमावून विजय मिळविला.
२००२ मध्ये “नॅटवेस्ट मालिकेच्या” पाचव्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर डॅरेन गफने (Darren Gough) पुन्हा एकदा भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा मार्ग दाखविला. चेस्टर-ले-स्ट्रीट मध्ये भारताची सुरूवात खराब झाली होती. परंतु त्यातून सावरत भारताने सचिन तेंडुलकरच्या नाबाद १०५ धावांच्या मदतीने २८५/४ अशी धावसंख्या उभारली, पण प्रत्युत्तरात इंग्लंडने ५३/१ धावा केल्या असताना पाऊस पडायला सुरुवात झाली आणि मग सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
२००३ मध्ये भारतीय संघ न्यूझीलंड दौर्यावर वेलिंग्टनमध्ये खेळात आलेल्या पाचव्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने सर्व बाद १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मैदनात उतरलेला भारतीय संघातील सलामीचा फलंदाज कर्णधार सौरव गांगुली डॅरिल टफीनच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण त्यावेळी युवराज सिंगच्या ५४ आणि झहीर खानच्या ३४ धावांच्या मदतीने भारताने ८ गडी गमावून ४४ व्या षटकात विजय मिळवला होता.
४. विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)
२००१ मध्ये कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या कोका-कोला कपच्या आठव्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चमिंडा वासने विरेंद्र सेहवागला बाद केले. मात्र, भारतीय संघाने युवराज सिंगच्या नाबाद ९८ धावांच्या मदतीने २२७/८ धावा केल्या, त्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १८१ धावा करून सर्वबाद झाला आणि भारताने ४६ धावांनी विजय मिळविला.
२००२ मध्ये खेळलेल्या नॅटवेस्ट मालिकेच्या सहाव्या सामन्यात श्रीलंकेने एजबॅस्टन येथे प्रथम फलंदाजी करताना १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चमिंडा वासने दुसर्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर विरेंद्र सेहवागला बाद करून भारताला मोठा धक्का दिला, पण राहुल द्रविडच्या ६४ धावांच्या मदतीने भारताने ४ विकेटने विजय मिळवला.
२००३ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मुंबईच्या मैदानात प्रथम फलंदाजी करताना २८६/८ धावा केल्या, त्यात डाॅमियन मार्टिनने शतकी खेळी केली. प्रत्युत्तरात भारतीय संघ मैदानात उतरला आणि भारतीय डावाच्या पहिल्याच चेंडूवर नॅथन ब्रॅकनने विरेंद्र सेहवागला बाद केले. २०९ धावांवर संपूर्ण भारतीय संघ सर्वबाद झाला आणि तो सामना ऑस्ट्रेलियाने ७७ धावांनी जिंकला.
५. कृष्णमाचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth)
१९८६ मध्ये भारत संघ इंग्लंड दौर्यावर टेक्सॅको ट्रॉफी दरम्यान खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड १६२ धावा करुन ऑलआऊट झाला होता. १६२ धावा करण्यासाठी भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज कृष्णामाचारी श्रीकांत आणि सुनील गावस्कर मैदानात उतरले. डावाच्या पहिल्याच चेंडूवर कृष्णामाचारी श्रीकांतला ग्रॅहम डिलीने बाद केले. तथापि, सुनील गावस्कर नाबाद ६५ आणि मोहम्मद अझरुद्दीन नाबाद ८३ धावा करत ओव्हलमध्ये भारताने ९ राखून एकतर्फी विजय मिळवला.
६. मनोज प्रभाकर (Manoj Prabhakar)
११९४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेच्या दुसर्या सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळवला. मुंबईमध्ये वेस्ट इंडिजने पहिली फलंदाजी करत ९ गडी गमावून १९२ धावा केल्या होत्या, त्या प्रत्युत्तराला कर्टनी वॉल्शने भारतीय डावाच्या पहिल्याच चेंडूवर मनोज प्रभाकरला बाद केले होते. तथापि, नवज्योतसिंग सिद्धूच्या नाबाद 65 धावांच्या मदतीने भारताने पावसामुळे सामना थांबविण्यापर्यंत ३३.१ षटकांत १३५/४ धाव केल्या होत्या आणि नियमांनुसार भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या पुढे होता, त्यामुळे भारताला विजेते घोषित करण्यात आले.