विजयासाठी 48 चेंडूत आणि 48 धावा हव्या होत्या. पाकिस्तानचे 8 फलंदाज बाकी होते….मात्र इथून बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ पराभूत झाला! होय हे खरं आहे! टी20 विश्वचषकात भारतानं पाकिस्तानवर पुन्हा एकदा विजय मिळवला आहे.
एकेकाळी पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित दिसत होता. संघाला 48 चेंडूत 48 धावा करायच्या होत्या आणि त्यांचे 8 फलंदाज बाकी होते. मात्र यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केलं. भारताच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानी फलंदाज हतबल आणि असहाय्य दिसत होते. पाकिस्तानचा या सामन्यात 6 धावांनी पराभव झाला.
120 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकेकाळी पाकिस्तानची धावसंख्या 12 षटकांत 2 गडी गमावून 72 अशी होती. यानंतर भारताकडून 13 वं षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्या आला. या षटकात हार्दिकनं फखर जमानची महत्त्वाची विकेट घेतली. हा पाकिस्तानला बसलेला तिसरा धक्का होता. येथून त्यांची पडझड सुरू झाली.
पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान संथ पण चांगली फलंदाजी करत होता. त्यानं एक टोक सांभाळून धरलं होतं. मात्र जसप्रीत बुमराहनं 15 व्या षटकात त्याला बोल्ड करून सामना पूर्णपणे फिरवला. यानंतर आवश्यक धावगती वाढत राहिली, आणि पाकिस्तानच्या विकेट पडत गेल्या. यानंतर पाकिस्तानच्या डगआऊटमध्ये अस्वस्थता वाढत गेली. उर्वरित काम भारतीय गोलंदाजांनी फत्ते केलं!
भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचे फलंदाज हतबल दिसत होते. इमाद वसीम 23 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. तर इफ्तिखार अहमदनं 9 चेंडूत 5 धावा करत पाकिस्तानच्या अडचणीत भर घातली. टीम इंडियाचे गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत होते. जसप्रीत बुमराह भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं 4 षटकात 14 धावा देत 3 बळी घेतले. हार्दिक पांड्यानं 4 षटकात 24 धावा देत 2 फलंदाजांची शिकार केली. याशिवाय अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.
या विजयानंतर भारतीय संघाचे 2 सामन्यांत 4 गुण झाले आहेत. तर पाकिस्तानचे 2 सामन्यांत 2 पराभवानंतर शून्य गुण आहेत. ‘अ’ गटात भारतीय संघ अव्वल स्थानी आला असून, अमेरिकेचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धोबीपछाड! गोलंदाजांची अविश्वसनीय कामगिरी
खेळाडूंमधील बाचाबाची, चाहत्याला मारहाण; भारत-पाकिस्तान सामन्यांतील टॉप 5 वाद
टी20 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा जाहीर, 20 दिवस चालणार स्पर्धा