नागपूर। रविवारी (10 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात तिसरा आणि निर्णायक टी20 सामना(3rd T20I) पार पडला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने(Deepak Chahar) हॅट्रिकसह 6 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
त्याने 3.2 षटके गोलंदाजी करताना केवळ 7 धावा देत या 6 विकेट्स घेतल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये हॅट्रिक(hat-trick) घेणारा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
तसेच चाहर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा भारताचा एकूण आठवा गोलंदाज ठरला आहे.
याआधी कसोटीमध्ये भारताच्या हरभजन सिंग, इरफान पठाण आणि जसप्रीत बुमराह यांनी हॅट्रिक घेतली आहे. वनडेमध्ये चेतन शर्मा, कपिल देव, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी या भारतीय गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली आहे.
चाहरने बांगलादेश विरुद्ध 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शफिउल इस्लामला बाद केले. त्यानंतर त्याने 20 व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर अनुक्रमे मुस्तफिजूर रेहमान आणि अल-अमिन हुसेनला बाद करत हॅट्रिक साजरी केली.
याबरोबरच चाहरने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन (Best figures in T20Is) करण्याचाही विक्रम रचला आहे.
रविवारी विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या भारत-बांगलादेश संघातील या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने 30 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने 3 सामन्यांची टी20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारे भारतीय गोलंदाज –
कसोटी –
हरभजन सिंग – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कोलकाता, 2001
इरफान पठाण – विरुद्ध पाकिस्तान, कराची, 2006
जसप्रीत बुमराह – विरुद्ध वेस्ट इंडिज, किंग्स्टन, 2019
वनडे –
चेतन शर्मा – विरुद्ध न्यूझीलंड, नागपूर, 1987
कपिल देव – विरुद्ध श्रीलंका, कोलकाता, 1991
कुलदीप यादव – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कोलकाता, 2017
मोहम्मद शमी – विरुद्ध अफगाणिस्तान, साऊथँप्टन, 2019
आंतरराष्ट्रीय टी20 –
दिपक चाहर – विरुद्ध बांगलादेश, नागपूर, 2019






