एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी संपल्यानंतर सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं एकच नाव आहे. ते म्हणजे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज. केनिंग्टन ओव्हलवरील सिराजच्या गोलंदाजीने फॅन्ससोबतच दिग्गजांच्या मनातही ठसा उमटवला आहे. सध्याचे खेळाडू असोत किंवा माजी खेळाडू, सर्वजण सिराजच्या कौशल्याचे कौतुक करताना थकत नाहीत. विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांचे नावही या यादीत आले असून, त्यांनी मोहम्मद सिराजला संघाचा खरा हिरो असल्याचे म्हटले आहे.
दिग्गज ऑलराउंडर कपिल देव यांचे मत आहे की, टीम इंडियाला मोहम्मद सिराजसारख्या आणखी अनेक गोलंदाजांची गरज आहे. मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत कपिल देव यांनी सिराजचं कौतुक करताना सांगितले, “सिराज हा खरा हिरो आहे. चांगली गोष्ट म्हणजे त्याने काहीही विलक्षण करण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त चेंडू योग्य जागी टाकत राहिला, विशेषत: ऑफ स्टंपच्या आसपास, आणि त्याला यश मिळत गेले. सिराजने गोलंदाजी आघाडीचे नेतृत्व केले आणि तेही धाडसाने. भारतीय क्रिकेटला अजून सिराजसारखे खेळाडू हवे आहेत.”
माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी ओव्हल टेस्टमधील सिराजच्या योगदानाची आठवण काढत सांगितलं, “सिराज शेवटच्या दिवशी पूर्ण जोशात होते आणि त्यांनी संपूर्ण संघाचं मनोबल वाढवले. जेमी स्मिथ हा धोकादायक फलंदाज होता, आणि जेव्हा सिराजने त्याला बाद केले, तेव्हा भारतीय संघाचा आत्मविश्वास परत आला. चौथ्या दिवशी सिराजकडून एक झेल सुटला, तरी त्यानंतर त्यांनी आपली सर्वोत्तम गोलंदाजी केली. हा एक दुर्मीळ आणि उत्तम गुण आहे. ते कधीच दबावाखाली दिसले नाहीत. इंग्लंडला 35 धावा आणि भारताला चार गडी हवेत अशी परिस्थिती होती. पाचव्या दिवसाच्या सकाळीही हीच स्थिती होती आणि आम्ही चारही गडी घेतले. आपण कदाचित उत्तम इंग्रजी बोलू शकत नसलो तरी, क्रिकेट सामना जिंकण्यासाठी इंग्रजी बोलणे गरजेचे नसते हे आमच्या संघाने सिद्ध करून दाखवले.”






