भारतीय क्रिकेट संघ सध्या कमालीच्या फॉर्मातून जात आहे. काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियन भूमीवर त्यांनी कसोटी मालिकेत अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय साकारला होता. त्यांनतर आता इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या तिन्ही मालिकांमध्ये भारतीय संघाने यश मिळवले आहे.
प्रथमतः कसोटी मालिकेत भारताने ३-१, मग त्यांनतर टी२० मालिकेत ३-२ आणि त्यांनतर नुकत्याच संपलेल्या वनडे मालिकेत २-१ अशा फरकाने इंग्लंडला पराभूत केले. भारतीय संघाच्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील या वर्चस्वपूर्ण खेळाने अनेक दिग्गजांना प्रभावित केले आहे. यातीलच एक म्हणजे ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज इयान चॅपेल.
भारतीय संघ दीर्घकालीन वर्चस्वाच्या तयारीत
एका क्रीडा संकेतस्थळासाठी लिहिलेल्या इयान चॅपेल म्हणाले, “भारतीय संघाचे गेल्या काही काळातील यश बघता, विशेषतः ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेतील विजय बघता, हा संघ कुठल्याही परिस्थितीचा सामना करून जिंकण्यासाठी तयार असल्याचे दिसून येते. आजच्या काळात ज्यावेळी सगळेच संघ परदेशात चांगली कामगिरी करण्यासाठी झगडत आहेत, अशावेळी भारतीय संघ ही गोष्ट बदलत आहे. आता पूर्वीप्रमाणे तुम्ही वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्या तयार करून भारताला हरवण्याची रणनिती वापरू शकत नाही.”
साधारणतः ८०च्या दशकाच्या सुमारास वेस्ट इंडिज आणि २००० नंतरच्या दशकात ऑस्ट्रेलिया यांनी जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. सध्याचा भारतीय संघ हा दबदबा निर्माण करू शकेल का, या प्रश्नाचे उत्तर देतांना ते म्हणाले, “भारतीय संघ त्याच मार्गावर आहे. आणि इथून पुढे सगळ्या गोष्टी त्यांनी नीट जुळवून आणल्या तर ते नक्कीच जागतिक क्रिकेटवर आपले वर्चस्व प्रस्थापित करतील. गेल्या काही महिन्यात उदयाला आलेल्या नवीन गुणवान खेळाडूंमुळे त्यांना हे शक्य झाले आहे.”
इयान चॅपेल यांच्या विधानानंतर आता भारतीय संघ येत्या काळात जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या:
पराभूत होऊनही इंग्लंड वर्ल्डकप सुपर लीगच्या अव्वलस्थानी कायम, तर भारतीय संघ या क्रमांकावर
जेव्हा पहिला भारतीय त्रिशतकवीर होण्याची भविष्यवाणी सेहवागने ३ वर्ष आधीच केली होती
सॅम करनच्या खेळीत एमएस धोनीची झलक दिसली, पाहा कुणी केलंय हे विधान