---Advertisement---

29 जूनचा ऐतिहासिक दिवस! भारताने ICC ट्रॉफी जिंकली; रोहित-कोहलीचा टी20ला निरोप

On: रविवार, जून 29, 2025 12:20 PM
---Advertisement---

भारतामध्ये तीन गोष्टी अत्यंत लोकप्रिय आहेत. सिनेमा, राजकारण आणि क्रिकेट. यातील क्रिकेटला तर देशात धर्माचं स्थान आहे. जेव्हा भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरतो, तेव्हा चाहत्यांसाठी तो क्षण एखाद्या सणासारखा असतो. महेंद्रसिंह धोनी, कपिल देव, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अनिल कुंबळे आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी जगभरात भारताचा डंका वाजवला आहे.

29 जून ही तारीख भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायमच कोरलेली आहे. 2024 मध्ये आजच्या दिवशी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 विश्वचषकावर कब्जा करत 17 वर्षांचा प्रतिक्षेचा अंत केला. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं.

29 जूनला झालेल्या फायनलमध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. सुरुवात मात्र खराब झाली. रोहित शर्मा (9), रिषभ पंत (0) आणि सूर्यकुमार यादव (3) स्वस्तात बाद झाले. पण त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलने 72 धावांची भागीदारी करत डाव सावरला. कोहलीने 59 चेंडूत 76 धावा (6 चौकार, 2 षटकार), तर अक्षरने 47 धावा (4 षटकार) केल्या. अखेरच्या ओव्हर्समध्ये शिवम दुबेने 16 चेंडूत 27 धावा करत भारताला 176 पर्यंत पोहोचवले.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने देखील दमदार खेळ केला. डि कॉकने 39, स्टब्सने 31 आणि क्लासेन-मिलर जोडीने तडाखेबाज फटकेबाजी केली. 15 ओव्हरपर्यंत आफ्रिकेचा स्कोअर 147 होता आणि विजयासाठी केवळ 30 चेंडूत 30 धावांची गरज होती. पण जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने अप्रतिम गोलंदाजी करत सामना भारताच्या बाजूने वळवला. अखेरच्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादवने मिलरचा घेतलेला अफलातून कॅच अखेर निर्णायक ठरला आणि भारताने सामना 7 धावांनी जिंकला.

फायनल सामन्यातील झंझावाती खेळीबद्दल विराट कोहलीला “प्लेअर ऑफ द मॅच”, तर संपूर्ण स्पर्धेत 15 विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला “प्लेअर ऑफ द टूर्नामेंट” घोषित करण्यात आले. याच ऐतिहासिक क्षणानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. काही दिवसांनी रवींद्र जडेजानेही संन्यास घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---