भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. हा डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी करून संघासाठी चांगली कामगिरी करतोच; परंतु आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाने तो संघासाठी धावा वाचवण्याचे कामही करतो. आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना आणि इंग्लंड दौऱ्यात जडेजा आणि आर अश्विन या जोडीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघातील २७ वर्षीय गोलंदाज अक्षर पटेल याने जडेजावर मोठा आरोप केला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जडेजाला दुखापतीमुळे संघाबाहेर जावे लागले होते. त्यामुळे इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत अक्षर पटेलला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत अक्षर पटेल सर्वाधिक गडी बाद करणारा दुसरा गोलंदाज होता. परंतु जडेजाचे आगमन झाल्यामुळे पटेलला संघात स्थान मिळणे कठीण दिसून येत आहे. याबाबत त्याने निराशा व्यक्त केली आहे.
त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “मला असे मुळीच वाटत नाही की, माझ्यात काही कमी आहे. दुखापत झाल्यामुळे दुर्दैवाने मला वनडे संघातून स्थान गमवावे लागले होते. कसोटी संघात आर अश्विन उल्लेखनीय कामगिरी करत आहे. परंतु ज्याप्रकारे रवींद्र जडेजा कामगिरी करत आहे. त्यावरून स्पष्ट होत आहे की, कुठल्याही डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजाला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवणे कठीण आहे. तर दुसरीकडे कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांची जोडी चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी चांगली कामगिरी करेल.”
संधी मिळत नसल्यामुळे व्यक्त केली नाराजी
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी चांगली खेळी करून सुद्धा मला संघात स्थान मिळत नव्हते. यामुळे मी मानसिकरीत्या खूप निराश झालो होतो. परंतु मला माहित आहे की अनेक असे क्रिकेटपटू आहेत, जे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतात. परंतु त्यांना भारतीय संघात स्थान दिले जात नाही. कारण आधीच खेळत असलेले खेळाडू चांगली कामगिरी करत असतात. त्यामुळे संयम ठेऊन वाट पाहणेच ठीक आहे.”
आतापर्यंत ३ कसोटीत २७ विकेट्स घेणाऱ्या अक्षर पटेलने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तरीदेखील त्याला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळणे कठीण दिसत आहे. कारण जडेजा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. अगदी कर्णधार विराट कोहलीही त्याच्या कामगिरीने प्रभावित झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल १०९ वर्षापासून ‘या’ गोलंदाजाचा विक्रम आहे अबाधित; एका दिवसात घेतलेल्या दोन हॅट्रिक
नाद करा पण आमचा कुठं! भारतीय क्रिकेटरचा पत्नीसोबत ‘खतरनाक वर्कआऊट’, पाहून फिरतील डोळे
‘धोनी फॅमिली’च्या घरात नवीन पाहुणा, पती-पत्नी संगतीनं घेत आहेत खूप काळजी






