न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिसनने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शानदार गोलंदाजी करत ५ बळी घेतले. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या बळीचाही समावेश होता. मात्र, यानंतर तो सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांकडून ट्रोल केला जाऊ लागला आहे.
पहिल्या डावात भारतीय संघाला केवळ २१७ धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने दोन बळी गमावत १०१ धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारे न्यूझीलंडचा संघ अद्याप ११६ धावा मागे आहे. सोमवारी (२१ जून) सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला.
जेमिसन सोशल मीडियावर ट्रोल
कायले जेमिसन आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून (आरसीबी) खेळतो. कोहलीला बाद केल्यानंतर चाहत्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की जेमिसनचा आयपीएल करारदेखील संपला पाहिजे. इतकेच नाही तर, त्याच्याबद्दल आणि त्याच्या आईबद्दलही अशोभनीय शब्दांचा वापर केला गेला. विराट कोहली व्यतिरिक्त जेमिसनने रोहित शर्मा आणि रिषभ पंत सारख्या दिग्गज फलंदाजांचेही बळी मिळवले.
कायले जेमिसन आपल्या कारकिर्दीतील ही केवळ आठवी कसोटी खेळत आहे. यामध्ये त्याने आतापर्यंत ४४ बळी घेतले आहेत. ५ वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रमही त्याने साध्य केला. आतापर्यंत न्यूझीलंडकडून कसोटी खेळणार्या गोलंदाजांपैकी पहिले आठ कसोटी सामने खेळताना कोणताही गोलंदाज जेमिसनप्रमाणे गोलंदाजी करू शकला नव्हता.
तसेच, जेमिसनने आणखी एका डावात गोलंदाजी करणे बाकी आहे. जेमिसनपूर्वी, जॅक कोव्हेने पहिल्या ८ कसोटी सामन्यांत ४१, शेन बाँडने ३८ आणि डग ब्रेसवेलने ३३ बळी घेतले होते. केन विलियम्सनच्या नेतृत्वात न्यूझीलंडच्या संघाने आतापर्यंत आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे संघ सध्या चांगल्या स्थितीत आहे.
अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे वर्चस्व
न्यूझीलंडने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्या तीन दिवसांवर वर्चस्व गाजवलेले दिसून येते. कायले जेमिसनच्या पाच बळींच्या जोरावर न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आणला. भारतासाठी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावा बनविल्या.
प्रत्युत्तरात, टॉम लॅथम व डेवॉन कॉनवे यांनी ३४.२ षटकात ७० धावांची सलामी दिली. लॅथम ३० धावांवर बाद झाल्यानंतर कॉनवेने आपला अप्रतिम फॉर्म कायम राखत अर्धशतक पूर्ण केले. दिवसाचा खेळ संपण्यासाठी दोन चेंडू शिल्लक असताना तो ५४ धावांवर बाद झाला. तिसऱ्या दिवसाखेर, न्यूझीलंडने २ बाद १०१ धावा बनविला होत्या. कर्णधार केन विलियम्सन व अनुभवी रॉस टेलर हे न्यूझीलंडसाठी मैदानावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC फायनलमधील एकाच घटनेसाठीच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे समोरासमोर आले रोहित आणि विराटचे चाहते
एकच नंबर! वयाच्या ८३ व्या वर्षी आजीबाई करतायेत वेटलिफ्टींग; व्हिडिओ पाहून बसेल आश्चर्याचा धक्का