भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षात अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. फलंदाज म्हणून तो श्रेष्ठ आहेच. परंतु एक कर्णधार म्हणून देखील त्याने आपल्या दर्जा उंचावला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय १९ वर्षाखालील संघाने विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला होता. त्यानंतर उल्लेखनीय कामगिरी करत त्याने २०११ विश्वविजेत्या संघात देखील स्थान मिळवले होते. याच संघातील एका खेळाडूने विराटचे तोंडभरून कौतुक केले आहे.
भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज युवराज सिंग याने कर्णधार विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्याने टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉमला म्हटले की, “२०११ च्या विराट कोहलीमध्ये आणि आताच्या विराट कोहलीमध्ये खूप फरक आहे. विराट जेव्हा संघात आला होता; तेव्हा त्याच्याकडून खूप चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली गेली होती. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली; तेव्हा त्याने संधीचे सोने केले आहे. त्यामुळेच त्याची विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यावेळी रोहित आणि विराट यांच्यात स्पर्धा सुरू होती. त्यावेळी देखील तो धावा करत होता. हेच कारण होते की, त्याला संधी मिळाली होती. तेव्हापासून विराटमध्ये खूप बदल जाणवला आहे.”(Indian former cricketer Yuvraj Singh praised Virat kohli)
गेल्या काही वर्षांत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. परंतु आयसीसीच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवण्यात अपयशी ठरल्यामुळे अनेकदा त्याच्या नेतृत्वावर टीका देखील करण्यात आली आहे. परंतु हे विसरून चालणार नाही की, विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ गेल्या ५ वर्षांपासून अव्वल स्थानी विराजमान होता.
तसेच युवराज सिंगने पुढे म्हटले की, “मी त्याला माझ्या डोळ्यांसमोर सराव करताना आणि पुढे जाताना पाहिले आहे.तो सर्वात जास्त मेहनत घेतो तसेच डायटच्या बाबतीतही तो खूप शिस्तबद्ध आहे. जेव्हा तो धावा करतो तेव्हा आपण पाहू शकता की त्याला जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून जगासमोर यायचे असते. हा त्याचा स्वॅग आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला, “लोकांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यांना महान खेळाडूची उपाधी मिळते. परंतु विराट कोहली वयाच्या ३० व्या वर्षीच महान खेळाडू झाला आहे. एक क्रिकेटपटू म्हणून त्याला मोठे होत असताना पाहून खूप बरे वाटते. अशी आशा व्यक्त करतो की,तो आणखी वरच्या स्तरावर जाऊन आपल्या कारकीर्दीतून निवृत्ती जाहीर करेल. कारण त्याच्याकडे भरपूर वेळ आहे. ”
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडमध्ये टीम विराट-रोहितशी भिडला अश्विन-पुजाराचा संघ, बघा चुरशीच्या लढतीत कोण ठरलं विजेता
आता मंत्रीच खेळणार क्रिकेट, क्रीडामंत्र्याची झालीय संभाव्य रणजी संघात निवड
SLvIND: दुसऱ्या वनडे सामन्यात पावसाची शक्यता, पाहा कसे असेल आज कोलंबोतील हवामान?