श्रीलंका संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मात्र, संघाशी संबंधित एक प्रकरण अजूनही चर्चेत आहे. ते म्हणजे अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट होय. मॅथ्यूजच्या अशाप्रकारे बाद होण्याची चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीये. विशेष म्हणजे, भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला जेव्हा याविषयी प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्याने स्पष्ट केले की, भारतीय संघाने जरी कुणाविरुद्ध टाईम आऊटची अपील केली नाही, पण जर कुणी असे केले, तर ते नियमामध्ये बसते. यात गैर काहीच नाही.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याने संकेत दिले की, संधी मिळूनही भारत ‘टाईम आऊट’ (Time Out) पद्धतीचा आधार घेणार नाही. मात्र, त्याने म्हटले की, कोणीही कुणाला दोष देऊ शकत नाही. कारण, हे खेळाच्या नियमात बसते. भारताला अखेरचा सामना रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) एम चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये नेदरलँड्सविरुद्ध खेळायचा आहे. यापूर्वी द्रविडने आपले मत मांडले.
द्रविडची प्रतिक्रिया
तो म्हणाला, “जसे तुम्ही म्हणालात, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. आमचे स्वत:चे मन आहे, आपले विचार आहेत. आमच्यातील प्रत्येक व्यक्ती कोणत्याही विशेष स्थितीविषयी वेगळा विचार करेल. तसेच, वास्तवात कुणीही योग्य आणि चुकीचा नाहीये. तुम्ही दोन्ही स्थितींवर चर्चा करू शकता. तुम्ही चर्चा करू शकता की, आपल्याला नियमाचे तसेच पालन करावे लागेल का, जसे ते आहेत किंवा कधीकधी खिलाडूवृत्तीसाठी थोडी सूट द्यायला पाहिजे. अशात लोक दोन्ही प्रकारची मते देतील.”
शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याला अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याच्याविरुद्ध अपील केल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले गेले. तसेच, माजी क्रिकेटपटूंनीही त्याच्यावर टीका केली. मॅथ्यूज बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट पद्धतीने बाद होणारा पहिला फलंदाज बनला होता. सामन्यानंतर मॅथ्यूजने बांगलादेशच्या क्रिकेटपटूंवर जोरदार निशाणा साधत त्यांना अपमानास्पद म्हटले. द्रविड म्हणाला की, “एमसीसीने ठरवलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी शाकिबला दोष दिला नाही पाहिजे.”
द्रविड म्हणाला, “मतभेद असणे ठीक आहे. काही लोक सहमत होऊ शकत नाहीत. इतर म्हणतील, ‘नियमांनी मला असे करण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे हे असेच आहे.’ मला नाही वाटत की, जर कोणी नियमानुसार वागत असेल, तर तुम्ही त्याविषयी तक्रार करू शकता. कारण, प्रामाणिकपणे तो फक्त नियमाचे पालन करत आहे. तुम्ही हे स्वत: करू शकत नाहीत, आम्ही हे करू शकत नाही, पण तुम्ही याचे पालन करण्यासाठी कोणालाही दोषी ठरवू शकत नाहीत. कारण, तुम्ही तो नियम लागू केला आहे. तुम्ही हे निवडता की नाही, हे पूर्णपणे तुमचा स्वत:चा निर्णय आहे.”
भारतीय संघाची कामगिरी
भारतीय संघाची विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर भारताने आतापर्यंत खेळलेल्या सर्व 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच, भारत उपांत्य सामन्यापूर्वी आपला नववा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघाविरुद्ध आपल्या मागील दोन्ही सामन्यात भारत विरोधी संघांना 100पेक्षा कमी धावसंख्येवर सर्वबाद करण्यात यशस्वी झाला आहे. आता नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Indian head coach rahul dravid on timed out dismissal says india may not do it but we can t blame anyone for doing it 2023)
हेही वाचा-
Happy Diwali: अफगाणी खेळाडूची मन जिंकणारी कृती! मध्यरात्री फुटपाथवर झोपलेल्यांना वाटले पैसे, कौतुकच कराल
विश्वचषकात 500 पेक्षा जास्त धावा खर्च करणारे गोलंदाज, एक बॉलर थोडक्यात वाचला; पाहा यादी