जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर १८ ते २३ जून दरम्यान हा सामना खेळवला गेला होता. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला ८ विकेट्सने मात दिली. मात्र या सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्येच थांबला आहे. कारण ऑगस्ट महिन्यापासून त्यांना इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
मात्र या मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. भारताच्या एका प्रमुख खेळाडूला दुखापत झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तसेच या दुखापतीमुळे हा खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला देखील मुकण्याची शक्यता आहे. एका क्रीडा संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे.
दुखापत गंभीर असण्याची शक्यता
भारतीय संघाचा हा दुखापत झालेला खेळाडू म्हणजे सलामीवीर शुबमन गिल. गिलला कुठल्याही बाह्य कारणांमुळे दुखापत झाली नसून शरीरातील अंतर्गत कारणाने ही दुखापत झाल्याचे वृत्त आहे. मात्र त्याच्या दुखापतीचे स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु ही दुखापत गंभीर असण्याची शक्यता असून गिलला यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या किंवा त्याहून पुढच्या काही कसोटी सामन्यांना देखील मुकावे लागू शकते.
आपला पहिलाच इंग्लंड दौरा खेळणाऱ्या गिलसाठी हा मोठा धक्का आहे. नुकत्याच झालेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपल्या छोटेखानी खेळीने त्याने सगळ्यांनाच प्रभावित केले होते. इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने तर ‘गिलचा हा इंग्लंडमधील पहिला दौरा आहे, असे अजिबात वाटले नाही’, अशा शब्दात त्याची पाठ थोपटली होती. त्यामुळे दुखापतीतून सावरून लवकरात लवकर पुनरागमन करण्याचे त्याचे ध्येय असेल.
‘या’ खेळाडूंचे आहेत पर्याय
दरम्यान, शुबमन गिलला दुखापत झाली असली तरी तो संघासह इंग्लंडमध्येच थांबणार आहे. कारण इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू व्हायला अद्याप तरी पाच आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र जर तोवर गिल दुखापतीतून सावरला नाही तर भारताला त्याचा पर्याय शोधावा लागेल. त्याच्या स्थानासाठी भारताकडे केएल राहुल आणि मयंक अगरवाल हे पर्याय भारताकडे उपलब्ध आहेत. यापैकी एका खेळाडूला गिलच्या स्थानावर संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या:
मित्रांसह युरो कप २०२० चा सामना पाहायला गेला रिषभ पंत, पण ‘या’ कारणामुळे चाहत्यांनी केले ट्रोल
खुशखबर! भारतीय महिला गोल्फपटू आदिती अशोक टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र
रोड टू टोकियो! भारताच्या ‘या’ दोन जलतरणपटूंनी मिळवली ऑलिंपिकची पात्रता