मुंबई । भारताचा माजी वेगवान गोलंदाज अविष्कार साळवी याची पडुचेरी क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. मुंबईचे प्रथम श्रेणी क्रिकेटर ओंकार खानविलकर हे संघाचे सहाय्यक प्रशिक्षक असतील. तसेच राजस्थानचे माजी यष्टीरक्षक फलंदाज दिशांत याग्निक यांची क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
38 वर्षीय साळवी याची कर्नाटकचे माजी फलंदाज जे. अरुणकुमार यांच्या जागी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबाबत सीएसीचे अधिकारी म्हणाले की, “पडुचेरी संघासोबत काम करत असताना पहिल्या सत्रात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. ते खेळाडूंना चांगल्या प्रकारे ओळखतात. म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत.”
मुंबईचा माजी खेळाडू साळवी या नियुक्तीबाबत बोलताना म्हणाला की, ” पडुचेरी संघासोबत हा माझा दुसरा कार्यकाळ आहे. पहिल्या सत्रात देखील मी संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. मला पुन्हा नियुक्ती दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट पुन्हा कधी सुरू होईल व तो कसा खेळला जाईल याबाबत कोणतीच माहिती नाही.”
साळवी यांची गोलंदाजीची शैली ही ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा यांच्याशी मिळतीजुळती होती. एप्रिल 2013 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने भारताकडून पदार्पण केले होते. त्याने अवघ्या चार वनडे सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. दुखापतीने घेरल्याने त्यांची क्रिकेटमधली कारकीर्द लवकर संपली. 2009 साली आयपीएलमधील दिल्ली डेअर डेव्हील्सच्या संघाने त्याला निवडले होते. मात्र भारतीय संघात त्याचे पुनरागमन झाले नाही.