क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांबरोबरच क्षेत्ररक्षकांची भूमिका देखील अतिशय महत्वाची असते. गोलंदाजांनी निर्माण केलेल्या संधी क्षेत्ररक्षकांनी झेल घेत अचूक टिपल्या तरच ते प्रयत्न विकेटमध्ये परावर्तीत होतात. त्यामुळेच ‘कॅचेस विन मॅचेस’ असेही म्हणतात. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये झेल टिपणे, अजूनच महत्वाचे असते. कारण यात फलंदाज अतिशय कमी संधी देत असतात.
भारतीय संघाबाबत बोलायचे झाले तर गेल्या काही वर्षांत त्यांच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा गेल्या वर्षांत अतिशय सुधारला आहे. याचेच फळ म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सध्या ते जगात अव्वल स्थानी आहेत. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत देखील अव्वल स्थान पटकावत त्यांनी अंतिम फेरी गाठली आहे. याच निमित्ताने आत्तापर्यंत विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांचा आढावा या लेखातून घेऊया.
३) विराट कोहली – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा संघातील सगळ्यात फिट खेळाडूंपैकी एक आहे. तसेच तो एक अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे. स्लिप मधील क्षेत्ररक्षणासह मिडविकेट आणि कव्हर्स अशा मोक्याच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यात तो माहीर आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत देखील कोहलीने क्षेत्ररक्षणाने आपल्या गोलंदाजांना पुरेपूर साथ दिल्याचे दिसून आले आहे. त्याने या स्पर्धेत १४ सामन्यात एकूण १६ झेल टिपले आहेत.
२) रोहित शर्मा – भारताच्या कसोटी संघात नुकताच स्थिरावत असलेला रोहित शर्मा स्लिप मधील क्षेत्ररक्षणात माहीर आहे. वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत असतांना स्लिपमध्ये कठीण झेल टिपत त्याने क्षेत्ररक्षणात नेहमीच योगदान दिले आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्याने १६ झेल टिपत भारताकडून सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे त्याने ११ सामन्यातच ही कामगिरी केली आहे.
१) अजिंक्य रहाणे – अजिंक्य रहाणे हा भारतीय संघातीलच नव्हे तर सध्या जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे. स्लिप मधील क्षेत्ररक्षणाचे त्याचे कौशल्य वादातीत आहे. त्यामुळेच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाकडून सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले आहे, यात काहीच आश्चर्य नाही. रहाणेने आत्तापर्यंत या स्पर्धेत १७ सामन्यात २२ झेल टिपण्याची किमया केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvNZ: विराटचा भिडू भारतीय फलंदाजांसाठी ठरणार कर्दनकाळ, अवघ्या ६ कसोटीत घेतल्यात ३६ विकेट्स
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा वार्षिक करार जाहीर, नव्या गुणांकन पद्धतीसह तब्बल ८ खेळाडूंना डच्चू
दिग्गजाने कमिन्ससह ४ ऑसी गोलंदाजांना ओढले बॉल टेम्परिंग प्रकरणात; म्हणाला, “त्यांच्या साथीदाराने…”