रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं गुरुवारी (20 जून) टी20 विश्वचषकच्या सुपर-8 सामन्यात अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. बार्बाडोसची राजधानी ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळलेल्या या सामन्यात भारतीय खेळाडू हाताला काळ्या पट्ट्या बांधून आले होते. आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, भारतीय खेळाडूंनी असं का केलं? तर याचं उत्तर आम्ही तुम्हाला देतो.
भारतीय खेळाडूंनी या सामन्यात काळ्या पट्ट्या बांधून माजी भारतीय क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वास्तविक, जॉन्सन यांचा गुरुवारी (20 जून) अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.
त्याच दिवशी भारतीय संघानं टी20 विश्वचषक 2024 च्या पहिला सुपर-8 सामना खेळला. यामुळे भारतीय खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधून डेव्हिड जॉन्सन यांना श्रद्धांजली वाहिली. जॉन्सन 52 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. जॉन्सन त्यांच्या घराजवळ क्रिकेट अकादमी चालवत होते, मात्र ते काही काळापासून आजारी होते.
डेव्हिड जॉन्सन यांची क्रिकेट कारकीर्द
उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन यांनी भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले. या कालावधीत त्यांनी 47.66 च्या सरासरीनं 3 बळी घेतले. जॉन्सन यांना भारताकडून एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी 1996 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. जवागल श्रीनाथ जखमी झाल्यामुळे त्यांना संधी मिळाली होती.
डेव्हिड जॉन्सन यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी 39 प्रथम श्रेणी आणि 33 लिस्ट ए सामने खेळले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 28.63 च्या सरासरीनं 125 बळी घेतले आहेत. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही शतकही झळकावलं आहे. याशिवाय, जॉन्सन यांनी लिस्ट ए सामन्यात 41 विकेट घेतल्या. 2015 मध्ये ते कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये खेळले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या अफगाण विजयाचे 5 नायक, टीम इंडियाच्या या खेळाडूंनी निभावली महत्त्वाची भूमिका
बुमराह-अर्शदीपची धडाकेबाज गोलंदाजी, भारताचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी दमदार विजय!
17 वर्षीय खेळाडूचा भारतीय संघात समावेश, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध करणार पदार्पण