अहमदाबाद। बुधवारपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असून हा सामना भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठी खास ठरला आहे. या सामन्यात त्याने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
त्याला या सामन्यासाठी भारताच्या ११ जणांच्या संघात संधी मिळाली असल्याने हा त्याचा कारकिर्दीतील १०० वा सामना ठरला आहे. तो १०० वा कसोटी सामना खेळणारा ११ वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचबरोबर भारताचा कपिल देव यांच्यानंतरचा दुसराच वेगवान गोलंदाज ठरला आहे. आत्तापर्यंत भारताच्या वेगवान गोलंदाजांमध्ये केवळ कपिल देव यांनाच १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळता आले आहेत. त्यांनी १३१ कसोटी सामने खेळले आहेत.
भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळलेले क्रिकेटपटू –
२०० – सचिन तेंडुलकर
१६३ – राहुल द्रविड
१३४ – व्हीव्हीएस लक्ष्मण
१३२ – अनिल कुंबळे
१३१ – कपिल देव
१२५ – सुनील गावसकर
११६ – दिलीप वेंगसरकर
११३ – सौरव गांगुली
१०३ – विरेंद्र सेहवाग
१०३ – हरभजन सिंग
१०० – इशांत शर्मा
९९ – मोहम्मद अझरुद्दीन
इशांत कारकिर्द –
इशांतने यापूर्वी त्याच्या कसोटी कारकिर्दीत खेळलेल्या ९९ कसोटी सामन्यात ३०२ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने ११ वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच १ वेळा सामन्यात १० विकेट्स घेण्याची कारनामा केला आहे. याशिवाय इशांतने ८० वनडे सामने खेळताना ११५ विकेट्स आणि १४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना ८ विकेट्स घेतल्या आहेत.
इशांतचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
हा सामना पुर्नबांधणी केलेल्या मोटेरा स्टेडियमवर होत आहे. त्यामुळे हा सामना सुरु होण्याआधी या पुर्नबांधणी केलेल्या स्टेडियमचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळ्यानंतर इशांतचा १०० व्या कसोटी सामन्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
.@ImIshant was felicitated by the Honourable President of India Shri Ram Nath Kovind & Honourable Home Minister of India Shri Amit Shah before the start of play here in Ahmedabad.@rashtrapatibhvn @AmitShah pic.twitter.com/7elMWDa9ye
— BCCI (@BCCI) February 24, 2021
शंभराव्या सामन्याच्या तिसऱ्याच षटकात इशांतला विकेट
कारकिर्दीतील १०० वा सामना खेळण्यासाठी उतरलेल्या इशांतला पहिले यशही लवकर मिळाले. त्याने प्रथम फलंदाजी करत असलेल्या इंग्लंड संघाचा सलामीवीर डॉम सिब्लीला शुन्यावर डावाच्या तिसऱ्याच षटकात बाद केले. सिब्लीचा झेल दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने घेतला.
महत्त्वाच्या बातम्या