भारतीय संघ आता कसोटी मालिकेमध्ये श्रीलंकेवरील दणदणीत विजयानंतर रविवारपासून ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका लंकेत खेळाणार आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघाने व खेळाडूने अनेक विक्रम मोडले. आता भारतीय कर्णधार विराट कोहलीला या एकदिवसीय मालिकेत ही काही विक्रम मोडण्याची संधी आहे.
कसोटी मालिका विराटने फलंदाज म्हणून विशेष गाजवली नसली तरी एकदिवसीय मालिका ही विराटसाठी यादगार ठरणारी असू शकेल. या मालिकेत विराट काही खास विक्रम करणार आहे ज्यासाठी भारतीय दिग्गजांना अनेक वर्ष आणि अनेक सामने खेळायला लागले. अशाच या विक्रमांची ही यादी.
१. ५० वेळा नाबाद
भारतीय कर्णधार आतापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात २९८ सामने खेळला आहे . या सामन्यांमध्ये तो आतापर्यंत ४८ वेळा नाबाद राहिला आहे. जर तो या पाच सामन्याच्या मालिकेत फलंदाजीला येऊन २ वेळा नाबाद रहायला तर तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत ५० वेळा नाबाद राहण्याचा विक्रम करेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटध्ये सर्वाधिक वेळा नाबाद राहण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावे आहे, तो ११८ वेळा नाबाद राहिला आहे.
२. १५,००० धावा
२००८ ते २०१७ या त्याच्या आतापर्यंतच्या आंतररराष्टीय कारकिर्दीत २९८ सामन्यात विराटने १४,६६३ धावा केल्या आहेत. जर तो या मालिकेत ३६७ धावा करू शकला तर त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,००० धावा पूर्ण होतील. अशी कामगिरी करणारा तो भारताचा ७वा फलंदाज बनेल.
३. ३०० आंतररराष्ट्रीय सामने
विराट कोहलीने २००८ पासून ते आतापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात २९८ सामने खेळले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतला दुसरा सामना त्याच्या आंतररराष्टीय कारकिर्दीतील ३००वा सामना असणार आहे. भारताकडून ३०० आंतररराष्टीय सामने खेळणारा तो १२ खेळाडू बनेल. भारताकडून सचिन तेंडुलकरने सर्वाधिक म्हणजेच ६६४ आंतररराष्टीय सामने खेळले आहेत.
४. सचिननंतर भारताकडून सर्वाधिक आंतररराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज
आपल्या सर्वानाच माहित आहे की सचिन तेंडुलकरने भारताकडून खेळताना आंतररराष्टीय कारकिर्दीत १०० शतके लगावली आहेत. पण भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक शतके लागवण्याचा विक्रम भारताची भिंत राहुल द्रविडच्या नावे आहे. त्याने आंतररराष्टीय कारकिर्दीत ४८ शतके लगावली आहेत. तर विराटने आतापर्यंत आंतररराष्ट्रीय कारकिर्दीत ४५ शतके केली आहेत. जर तो या मालिकेत आणखीन ३ शतके करू शकला तर तो द्रविडच्या ही पुढे जाईल.
५. ५०वा टी२० आंतररराष्ट्रीय सामना
एकदिवसीय मालिकेनंतर भारत श्रीलंकेत एक टी२० सामना खेळणार आहे. हा सामना विराटचा टी२० कारकिर्दीतील ५० सामना असणार आहे. त्याने आतापर्यंतच्या टी२० सामन्यात १७४९ धावा केल्या आहेत ज्यात १६ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटची सरासरी टी२०मध्ये ५३ ची आहे. तर त्याचा स्ट्राईक रेट १३५ चा आहे.