भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका सुरु आहे. मालिकेचे दोन सामने झाले असून तिसरा सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार आहे. ॲडलेडमध्ये एक दिवस घालवल्यानंतर टीम इंडिया आज ब्रिस्बेनला रवाना झाली. मात्र रवाना होण्यापूर्वी भारतीय संघासोबत एक विचित्र घटना घडली.
झालं असं की, कर्णधार रोहित शर्माच्या विनंतीवरून टीम बसनं सलामीवीर यशस्वी जयस्वालला हॉटेलमध्येच सोडलं. त्याला बस पकडायला उशीर झाल्यामुळे हा प्रकार घडला. मात्र चांगली बातमी म्हणजे तो त्याच फ्लाइटनं ब्रिस्बेनला रवाना झाला.
टीम इंडियानं बुधवार 11 डिसेंबर रोजी ॲडलेडमधील त्यांचं हॉटेल पहाटेच सोडलं आणि ब्रिस्बेनसाठी फ्लाइट घेतली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी शनिवार, 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनच्या गाबा या प्रतिष्ठित स्टेडियमवर खेळली जाणार आहे. मात्र आश्चर्याचं म्हणजे, भारतीय खेळाडूंना विमानतळावर घेऊन जाणारी बस यशस्वी जयस्वालशिवायच निघाली. हे सर्व कर्णधार रोहित शर्माच्या सूचनेनुसार घडलं, कारण यशस्वीला टीम हॉटेलमधून बाहेर यायला उशीर झाला होता. एका खेळाडूमुळे संपूर्ण संघाला उशीर होऊन फ्लाईट चुकली जाऊ नये असं कर्णधाराला वाटलं.
‘क्रिकट्रॅकर’च्या वृत्तानुसार, यशस्वी जयस्वालच्या या वागण्याचा रोहित शर्माला राग आला होता. टीमची बस स्थानिक वेळेनुसार सकाळी 8:30 वाजता विमानतळाकडे जाणे अपेक्षित होते. टीमचं ब्रिस्बेनला जाणारं फ्लाइट सकाळी 10:05 वाजता उड्डाण घेणार होतं. भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य सकाळी 8.20 वाजल्यापासूनच बसमध्ये चढू लागले. मात्र, यशस्वी जयस्वाल कुठेही दिसला नाही. बस गेटजवळ काही मिनिटे थांबल्यानंतर रोहित शर्मा खाली उतरून संघ व्यवस्थापक आणि संपर्क अधिकाऱ्यांशी बोलला.
थोड्याशा संवादानंतर रोहित पुन्हा बसमध्ये चढला. रोहितच्या इशाऱ्यावर चालकानं यशस्वीशिवाय सकाळी 8.50 च्या सुमारास बस विमानतळाकडे सोडली. बस सुटल्यानंतर पाच मिनिटांनी यशस्वी हॉटेलमधून बाहेर आला. तो लगेच संघाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांसह एका कारमध्ये विमानतळावर पोहोचला आणि भारतीय संघासोबत ब्रिस्बेनला रवाना झाला.
हेही वाचा –
भारतीयांना खेळांमध्ये सर्वाधिक रस! गुगलच्या टॉप 10 मधील 5 सर्च खेळांशी संबंधित
मोहम्मद रिझवानचा रेकॉर्ड, टी20 क्रिकेटमध्ये दोनदा केला हा लाजिरवाणा विक्रम
मॅच न खेळता भारताने केला विश्वविक्रम, सामनाच्या 200 दिवस आधीच सर्व तिकिटांची विक्री!