भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यासाठी अवघा एक दिवस उरला आहे. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांचे आयोजन चेपॉक नावाने प्रसिद्ध चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर करण्यात आले आहे. पहिला कसोटी सामना ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे, तर दुसरा सामना १३ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत खेळवला जाणार आहे.
तत्पुर्वी जाणून घेऊया, चेन्नईच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड संघांमध्ये कोणत्या संघाचे पारडे जड आहे?
भारताने जिंकलेत इंग्लंडपेक्षा जास्त सामने
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आजवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात ९ कसोटी सामने झाले आहेत. यातील ५ सामन्यात यजमान भारतीय संघाने विजयी पताका झळकावली आहे; तर पाहुण्या इंग्लंडच्या नशीबी अवघे ३ विजय आले आहेत. याव्यतिरिक्त १९८२ मध्ये झालेला उर्वरित एक सामना अनिर्णीत सुटला होता.
जर चेपॉक स्टेडियमवरील भारतीय संघाच्या सर्व कसोटी सामन्यांविषयी बोलायचे झाले, आजवर भारताने या मैदानावर एकूण ३२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी १४ सामन्यात भारताला विजय ६ सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. शिवाय ११ सामने अनिर्णीत आणि १ सामना बरोबरीत सुटला होता.
मागील सामन्यात भारताचा झाला होता थरारक विजय
यापुर्वी जवळपास ४ वर्षांआधी म्हणजे २०१६ मध्ये इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता. या दोऱ्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना चेपॉक स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात भारताने एक डाव ७५ धावांनी ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला होता. फलंदाज करूण नायर अफलातून त्रिशतकी खेळी करत भारताच्या विजयाचा नायक ठरला होता.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतापुढे ४७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. अष्टपैलू मोईन अली याच्या १३ चौकार आणि एका षटाकाराच्या मदतीने केलेल्या १४६ धावांचा यात समावेश होता. प्रत्युत्तरात भारतीय खेळाडू करूण नायर याने ४ षटकार आणि ३२ चौकारांच्या मदतीने नाबाद ३०३ धावांची आतिशी खेळी केली होती. सोबतच सलामीला फलंदाजी करताना केएल राहुलने १९९ धावांची झुंजार खेळी साकारली होती.
यासह भारताने पहिल्या डावात २८१ धावांनी आघाडी मिळवत डाव घोषित केला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात अष्टपैलू रविंद्र जडेजाने इंग्लंडच्या ७ फलंदाजांची विकेट काढत २०७ धावांवर डाव गुंडाळला होता. परिणामत: १ डाव ७५ धावांनी भारताने तो सामना खिशात घातला होता.
यावरुन चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर इंग्लंडपेक्षा भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड संघातील येत्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारतीय संघाचे जिंकणे जवळपास निश्चित आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
“भारतात कसोटी क्रिकेट खेळतांना आयपीएलचा अनुभव नाही येणार कामी”, ‘या’ इंग्लिश गोलंदाजाची स्पष्टोक्ती
“….आणि सचिनला अस्वस्थ करत केले बाद”, नासिर हुसेनने उलगडला बंगलोर कसोटीचा किस्सा