भारतीय क्रिकेट संघ सध्या ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी-२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघाने वनडे मालिका गमावली आहे. ही मालिका गमावल्याने भारतीय संघावर चहूबाजूंनी टीका होत असतानाच नियमित उपकर्णधार रोहित शर्माची उणीव संघाला भासते आहे, असेही मत व्यक्त केले जात आहे.
स्नायूंच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे आणि टी-२० मालिकेला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत हा पराभव मिळाल्याने रोहित शर्मा विना भारतीय संघ जिंकू शकत नाही की काय, असा प्रश्न उपस्थित झाला. गेल्या काही सामन्यांतील आकडेवारीवरून हेच दिसत आहे.
रोहितविना खेळलेल्या सातही सामन्यांत पराभव
भारतीय संघ २०२० च्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या दौर्यावर होता. या दौर्यावर टी-२० मालिकेत भारताने विजय मिळविला. मात्र, त्यानंतर दुखापतीमुळे रोहित शर्माला संघाबाहेर जावे लागले होते. त्यानंतर रोहित शर्मा शिवाय खेळलेल्या सातही सामन्यांत भारतीय संघाला पराभवाची चव चाखावी लागली होती. या सामन्यांमध्ये न्यूझीलंड दौर्यावरील ३ वनडे, २ कसोटी आणि ऑस्ट्रेलिया दौर्यावरील २ वनडे सामन्यांचा समावेश आहे.
रोहित पार पाडतो दुहेरी जबाबदारी
भारतीय संघात रोहित शर्मा दुहेरी जबाबदारी पार पाडत असतो. सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना रोहित मोठ्या खेळी करून मॅचविनरची भूमिका निभावत असतो. त्याचप्रमाणे आयपीएल कर्णधारपदाचा अनुभव असल्याने रोहित संघाचा उपकर्णधार आणि वरिष्ठ खेळाडू या नात्याने संघाचे डावपेच आखण्यात मदत करतो. याच कारणांमुळे त्याची अनुपस्थिती भारतीय संघाला त्रासदायक ठरते आहे.
११ डिसेंबरला होणार फिटनेस टेस्ट
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे आणि टी-२० मालिकेतून फिटनेसच्या कारणास्तव रोहित शर्माला वगळण्यात आले होते. कसोटी मालिकेसाठी तो उपलब्ध असेल की नाही, याबाबत अजूनही साशंकता आहे. बंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमासाठी गेलेल्या रोहितची फिटनेस टेस्ट ११ डिसेंबरला होणार आहे. त्यानंतरच कसोटी मालिकेतील त्याच्या सहभागाबाबत निर्णय घेतला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”
ट्रेंडिंग लेख-
या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत
वनडेत सर्वाधिक महागडे ठरलेले ३ भारतीय स्पिनर; अव्वल क्रमांक ‘आश्चर्यकारक’






