मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पार पडला. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी जोरदार पुनरागमन केले आणि सुरुवातीपासून आपला दबदबा निर्माण करत हा सामना भारतीय संघाने ३७२ धावांनी आपल्या नावावर केला. यासह ही मालिका १-० ने आपल्या नावावर केली आहे. यासह भारतीय संघाने मायदेशात आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारतीय संघासाठी हा मायदेशातील सलग १४ वा कसोटी मालिका विजय ठरला आहे.
भारतीय संघाला भारतात येऊन पराभूत करणे सोपी गोष्ट नाही. इंग्लंड,ऑस्ट्रेलिया सारखे बलाढ्य संघ देखील भारतात येऊन कसोटी मालिका जिंकण्यात अपयशी ठरत असतात. तर गेल्या काही वर्षात भारतीय संघाने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसारख्या बलाढ्य संघांना मायदेशात एकही कसोटी मालिका जिंकू दिली नाही.
विराट कोहलीने कर्णधारपद स्वीकारल्यापासून तब्बल ५ वर्ष भारतीय संघ कसोटी संघांच्या यादीत सर्वोच्च स्थानी होता. याचे कारण देखील तितकेच खास आहे. विराट कोहलीने कर्णधारपद स्विकारल्यापासून भारतीय संघाने अनेक मोठ मोठ्या मालिका आपल्या नावावर केल्या आहेत.
तसेच ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच देशात जाऊन सलग २ वेळेस पराभूत केले आहे. इतकेच नव्हे तर इंग्लंड,न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत जाऊन देखील भारतीय संघाने आपला ठसा उमटविला आहे. परंतु, भारतात येऊन भारतीय संघाला कसोटी मालिकेत पराभूत करणे, गेला ८ वर्षांत कोणालाच जमले नाही.
साल २०१३ पासून भारतीय संघाने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाहीय. या कालावधीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला २ वेळेस, वेस्ट इंडिज संघाला २ वेळेस, दक्षिण आफ्रिका संघाला ३ वेळेस, न्यूझीलंड संघाला २ वेळेस, इंग्लंड संघाला २ वेळेस, बांगलादेश संघाला २ वेळेस, श्रीलंका संघाला १ वेळेस आणि अफगानिस्तान संघाला १ वेळेस पराभूत केले आहे.
गेल्या ८ वर्षांत भारतीय संघाने मायदेशात सलग १४ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. यातील ११ मालिका भारताने विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली जिंकल्या आहेत.
भारतीय संघाने २०१३ पासून मायदेशात खेळताना कसोटी मालिकेत मिळवलेले विजय
ऑस्ट्रेलिया – (४-०)
वेस्ट इंडिज – (२-०)
दक्षिण आफ्रिका – (३-०)
न्यूझीलंड – ( ३-०)
इंग्लंड – (४-०)
बांगलादेश- (१-०)
ऑस्ट्रेलिया – (२-१)
श्रीलंका – (१-०)
अफगानिस्तान -( १-०)
वेस्ट इंडीज (२-०)
दक्षिण आफ्रिका – (३-० )
बांगलादेश – (२-०)
इंग्लंड – (३-१)
न्यूझीलंड – (१-०)
महत्त्वाच्या बातम्या –
ऋतुराज गायकवाडला कर्णधारपद! भारतातील ‘या’ मोठ्या स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे नेतृत्त्व
विराटचे कर्णधारपद, तर अजिंक्यचे उपकर्णधारपद धोक्यात, बीसीसीआयने दिला इशारा
‘शुबमन गिलची चांगली सुरुवात, पण…’, सचिन तेंडुलकरने दिली मोठी प्रतिक्रिया