भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना येत्या ४ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. हा या मालिकेतील शेवटचा सामना असेल. याआधी झालेल्या तीन सामन्यांपैकी पहिला सामना पाहुण्या इंग्लंडच्या संघाने जिंकला होता, मात्र त्यापुढील दोन सामने जिंकत भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. त्यामुळे शेवटच्या सामन्याविषयी आता उत्कंठा निर्माण झाली आहे.
दरम्यान, चौथ्या सामन्याआधी भारतीय संघाला काहीसा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणामुळे शेवटच्या सामन्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी या सामन्यात कोणाला संधी द्यायची, हा प्रश्न भारतीय संघापुढे आहे.
काय आहेत पर्याय?
जसप्रीत बुमराह चौथ्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याने भारतीय संघासमोर पहिला पर्याय असेल तो म्हणजे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा. सिराजने मागील महिन्यातील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच आपले कसोटी पदार्पण केले होते. मात्र पदार्पणाच्या मालिकेतच प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत त्याने गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करत भारताकडून त्या मालिकेत सर्वाधिक बळी देखील घेतले होते. त्यामुळे त्याला या सामन्यात बुमराहच्या जागी संधी मिळू शकते.
बुमराहच्या स्थानासाठी भारतीय संघाकडे दुसरा सक्षम पर्याय उमेश यादवच्या रुपात उपलब्ध आहे. उमेश यादव ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून दुखापतीमुळे संघाबाहेर होता. मात्र आता त्यातून सावरल्याने तिसऱ्या कसोटीपूर्वीच त्याचा संघात समावेश केला गेला आहे. उमेशची भारतीय खेळपट्ट्यांवरील कामगिरी बघता आणि रिव्हर्स स्विंग करण्याची त्याची क्षमता बघता भारतीय संघ त्यालाही संधी देण्याची शक्यता आहे.
चौथा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा
मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली असली तरी भारतीय संघासाठी चौथा सामना देखील महत्वाचा आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग तिसऱ्या कसोटीतील विजयाने काहीसा सुकर झाला असला तरी चौथ्या कसोटी पराभव भारताला या स्पर्धेबाहेर करू शकतो. अंतिम फेरीत न्यूझीलंडशी दोन हात करायचे असल्यास भारताला या सामन्यात विजय मिळवणे किंवा हा सामना अनिर्णीत राखणे आवश्यक आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ पूर्ण ताकदीनेच उतरेल आणि विजयासाठी प्रयत्न करेल, हे भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
अरे बापरे! एवढा खतरनाक फुलटॉस, चेंडू टप्पा न घेता हवेतून सरळ बाउंड्रीपार; पाहा थरारक व्हिडिओ
पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी आहे ही बॅड न्यूज! प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहाता येणार नाहीत वनडे सामने






