जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आठ दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली असून, सर्व खेळाडू चांगलीच मेहनत घेताना दिसत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंना गटागटाने सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. संपूर्ण सराव सत्रांमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांवर सर्वांचे लक्ष राहील. या ऐतिहासिक सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन गोलंदाजांचे बाबतीत एखादा कठोर निर्णय घेऊ शकते.
संघ व्यवस्थापन या खेळाडूला संधी देण्यास उत्सुक
भारतीय संघ या महत्वपूर्ण सामन्यात एखादा मोठा बदल करू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, संघ व्यवस्थापन युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला संधी देण्याचा विचार करत आहे. त्याला अनुभवी इशांत शर्माच्या जागी निवडले जाऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे ऑगस्ट २०१९ नंतर प्रथमच इशांत, शमी व बुमराह हे एकत्रितरित्या निवडीसाठी उपलब्ध आहेत.
भारताने मागील काळात परदेशात मिळवलेल्या विजयांमध्ये या तिघांचा सिंहाचा वाटा राहिला होता. तसेच, उमेश यादवसारखा अनुभवी गोलंदाज देखील भारताच्या ताफ्यात आहे. या परिस्थितीत सिराजला संधी मिळणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
या कारणांनी होऊ शकतो सिराजचा विचार
इशांत शर्मा व मोहम्मद सिराज यांच्यामध्ये तुलना करायची झाल्यास इशांतचे वय ३३ वर्ष तर, सिराज २७ वर्षाचा आहे. इशांतने इंग्लंडमध्ये १२ कसोटी सामने खेळले असून, सिराज प्रथमच इंग्लंड दौऱ्यावर जाईल. सध्या इशांत भारताचा सर्वात अनुभवी कसोटीपटू आहे. त्याने १०० कसोटी सामने खेळताना तब्बल ३०३ बडी आपल्या नावे केले आहेत. दुसरीकडे सिराज केवळ दोन कसोटी मालिकांमध्ये खेळला आहे. मात्र, तो इशांतपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करू शकतो.
इशांत शर्माला बाहेर बसवण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे रवींद्र जडेजाचा फॉर्म. आपली आक्रमक फलंदाजी तसेच, रविचंद्रन अश्विनसोबत मिळून तो इंग्लंडमध्ये फिरकीचे जाळे विणण्याचा उत्सुक असेल. या मैदानावर इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीने भारतीय संघाला चांगले त्रस्त केले होते. ते सामने उन्हाळ्याच्या अखेरीस खेळले गेलेले. मात्र, सध्या एजबॅस्टनमध्ये थंडी असून दोन्ही संघात चार वेगवान गोलंदाज खेळवण्याला प्राधान्य देतील.
महत्त्वाच्या बातम्या –
निलंबन झालेल्या ओली रॉबिन्सनचा ‘मोठा’ निर्णय, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतला ब्रेक
“तर मी एमएस धोनीला पाकिस्तानचा कर्णधार बनवले असते”
एमएस धोनीजवळ इतक्या बाईक्स आहेत, त्याला स्वत:लाही आकडा सांगता येत नाही, भारतीय क्रिकेटरचा खुलासा