दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (sa vs ind 2nd odi) यांच्यात ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ३१ धावांनी विजय मिळवला होता. यासह वनडे मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघातील मध्याक्रमातील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. तसेच जसप्रीत बुमराहला सोडलं, तर इतर सर्व गोलंदाजांनी ५० पेक्षा अधिक धावा खर्च केल्या होत्या. परिणामी भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला होता. भारतीय संघाला मालिकेत आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दुसऱ्या वनडे सामन्यात कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या वनडेसाठी या संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.
धवन – राहुलची जोडी करणार डावाची सुरुवात
शिखर धवनने (Shikhar Dhawan) भारतीय संघाला पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात करून दिली होती. वनडे संघात पुनरागमन करत असलेल्या शिखर धवनने ७९ धावांची खेळी केली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
परंतु, भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल (Shikhar Dhawan) याला अवघ्या १२ धावा करण्यात यश आले होते. तसेच कर्णधार म्हणून कामगिरीत सुधारणा करण्यासाठी त्याला या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. असे असले तरी राहुल सलामीलाच दुसऱ्या वनडेतही खेळताना दिसू शकतो. (Playing 11 of Indian team for second odi)
तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली
तसेच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर बुधवारी (१९ जानेवारी) पहिल्यांदाच तो एक खेळाडू म्हणून मैदानावर उतरला होता. या सामन्यात त्याने ५१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याच्यावर कुठलाही दबाव नव्हता. आता दुसऱ्या वनडे सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
मध्यक्रमातील फलंदाजांना करावी लागेल चांगली कामगिरी
तसेच चौथ्या क्रमांकावर रिषभ पंत आणि पाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. हे दोघेही फलंदाज पहिल्या वनडे सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. रिषभ पंत १६ धावा करत माघारी परतला होता, तर श्रेयस अय्यर १७ धावा करत माघारी परतला होता. असे असले तरी, संघव्यवस्थापन दुसऱ्या वनडेसाठी त्यांच्यावर विश्वास कायम ठेवू शकतात.
तसेच दुसऱ्या सामन्यात वेंकटेश अय्यर फिनिशरची भूमिका पार पाडू शकतो. पहिल्या वनडे सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. परंतु, त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. तो अवघ्या २ धावा करत माघारी परतला होता. तरी, संघव्यवस्थापन त्याच्यातील अष्टपैलू कौशल्यामुळे त्याला संघात कायम ठेवू शकतात. त्यामुळे जर त्याला दुसऱ्या वनडेत अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळाली तर त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
फिरकी गोलंदाजीची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर?
मालिकेतील पहिल्या सामन्यात युझवेंद्र चहल आणि आर अश्विन या दोघांना संघात स्थान देण्यात आले होते. परंतु, या दोघांनी ५० पेक्षा अधिक धावा खर्च केल्या होत्या. तसेच केवळ १ गडी बाद करण्यात यश आले होते. दोन्ही गोलंदाजांचा अनुभव पाहता भारतीय संघ दुसऱ्या वनडे सामन्यात देखील याच दोन गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो.
वेगवान गोलंदाजांमध्ये होणार बदल?
वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असणार आहे. त्याने पहिल्या वनडे सामन्यात २ गडी बाद केले होते. जसप्रीत बुमराहसह शार्दुल ठाकूरला देखील या संघात स्थान दिले जाऊ शकते. त्याने पहिल्या सामन्यात गोलंदाजीत फ्लॉप ठरल्यानंतर फलंदाजी करताना ५० धावांची तुफानी खेळी केली होती. तसेच भुवनेश्वर कूमारच्या जागी दीपक चाहर किंवा मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
मोठी बातमीः ‘रोहितसेने’साठी विश्वचषकाचा पहिला टप्पा आहे सोप्पा, भारताच्या ‘अ’ गटात आहेत हे संघ
मोठा बातमीः भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने, याचवर्षी ‘या’ दिवशी खेळणार सामना
हे नक्की पाहा: