आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी (२१ जानेवारी) आठव्या टी२० विश्वचषकाचे म्हणजे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचे (T20 World Cup 2022) वेळापत्रक घोषित केले आहे. या वेळापत्रकानुसार कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान सुपर १२ फेरीत आमने-सामने येणार आहेत.
१६ संघांत होत असलेल्या या स्पर्धेला १६ ऑक्टोबरपासून पहिल्या फेरीने सुरुवात होणार आहे. त्यानंतर २२ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान सुपर १२ फेरीचे सामने पार पडणार आहेत. सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ ऑक्टोबरला रविवारच्या दिवशी भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर आमने-सामने येणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन संघांनी टी२० विश्वचषक २०२२ साठी थेट सुपर १२ फेरीत प्रवेश केलेला असल्याने २३ ऑक्टोबरलाच एकमेकांविरुद्धच्या सामन्याने हे दोन्ही संघ स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात करतील. या दोन्ही संघांचा सुपर १२ फेरीसाठी ‘गट दोन’ मध्ये समावेश करण्यात आला आहे.
भारताला पराभवाचा वचपा काढण्याची संधी
टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारताला पाकिस्तानविरुद्ध गेल्यावर्षी दुबईत झालेल्या टी२० विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी असणार आहे.
संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे झालेल्या २०२१ टी२० विश्वचषकातही भारत आणि पाकिस्तान या दोन संघात सुपर १२ फेरीमध्ये लढत झाली होती. त्यावेळी पाकिस्तानने भारताला १० विकेट्सने पराभूत केले होते. तेव्हा पाकिस्तानने भारतावर विश्वचषकात पहिल्यांदाच विजय मिळवण्याचा कारनामा केला होता. आता या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न भारत २३ ऑक्टोबरला करेल, तर पाकिस्तान गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही कामगिरी करण्याच्या हेतूने मैदानात उतरेल.
अधिक वाचा – टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक घोषित; भारत-पाकिस्तान सामना रंगणार ‘या’ दिवशी
टी२० विश्वचषकात भारत वरचढ
विश्वचषकात आजपर्यंत नेहमीच भारताचा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वरचष्मा राहिल्याचे दिसून आले आहे. टी२० विश्वचषकाच्या इतिहासात आत्तापर्यंत सहावेळा दोन्ही संघ आमने सामने आले आहेत. यातील पाच सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे. पाकिस्तानने हा सामना गेल्यावर्षी जिंकला होता.
तसेच भारताने त्यापूर्वी २००७ टी२० विश्वचषकात साखळी सामन्यात तसेच अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विजय मिळविला होता. त्यानंतर २०१२, २०१४ व २०१६ विश्वचषकातही भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय साजरा केला आहे.
व्हिडिओ पाहा – २०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही
असे आहे भारताचे टी२० विश्वचषक २०२२ मधील वेळापत्रक
सुपर १२ फेरी
२३ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न
२७ ऑक्टोबर – भारत विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, सिडनी
३० ऑक्टोबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ
२ नोव्हेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश, ऍडलेड
६ नोव्हेंबर – भारत विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, मेलबर्न
बाद फेरी –
९ नोव्हेंबर – पहिला उपांत्य सामना, सिडनी
१० नोव्हेंबर – दुसरा उपांत्य सामना, ऍडलेड
१३ नोव्हेंबर – अंतिम सामना, मेलबर्न
महत्त्वाच्या बातम्या –
“स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे…” बीबीएल पदार्पणानंतर उन्मुक्त झाला भावूक
पुजारा-रहाणेचे ‘बुरे दिन’ सुरू! संघातील जागा तर जाणारच सोबत आर्थिक नुकसानही पक्के