आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी (२१ जानेवारी) ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या २०२२ टी२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक घोषित केले आहे. ही स्पर्धेची रुपरेषा देखील २०२१ टी२० विश्वचषकाप्रमाणेच असणार आहे. ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान २०२२ टी२० विश्वचषक होणार आहे.
या विश्वचषकाला १६ ऑक्टोबर रोजी पहिल्या फेरीने सुरुवात होईल. त्यानंतर २२ ऑक्टोबरपासून सुपर १२ फेरी खेळली जाणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा १६ देशांच्या संघात होणार असून सात वेगवेगळ्या शहरात सामने होणार आहेत. १६ देशांपैकी १२ देश निश्चित झाले असून ४ देशांचे संघ पात्रता फेरीनंतर निश्चित होतील.
सलामीचे सामने
या विश्वचषकात १६ ऑक्टोबर रोजी पहिल्या फेरीतील पहिला सामना श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात पहिला सामना पार पडेल. याच दिवशी पात्रता फेरीतून पहिल्या फेरीत प्रवेश केलेल्या संघांमध्येही सामना होणार आहे. सुपर १२ फेरीला २२ ऑक्टोबरला सुरुवात होणार असून पहिलाच सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडेल. हे दोन्ही संघ २०२१ टी२० विश्वचषकात अंतिम सामन्यात आमने-सामने होते.
त्यानंतर लगेचच २३ ऑक्टोबर रविवारी भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघात सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्याने हे दोन्ही संघ या स्पर्धेतील आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहेत. २०२१ टी२० विश्वचषकातही या दोन संघात सुपर १२ मध्ये लढत झाली होती. त्यावेळी पाकिस्तानने भारताला १० विकेट्सने पराभूत केले होते आणि भारतावर विश्वचषकात पहिल्यांदाच विजय मिळवण्याचा कारनामा केला होता. आता या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न भारत २३ ऑक्टोबरला करेल, तर पाकिस्तान गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही कामगिरी करण्याच्या हेतूने मैदानात उतरेल.
सुपर १२ फेरीचे सामने ६ नोव्हेंबरपर्यंत संपतील. त्यानंतर बाद फेरीचे सामने खेळवण्यात येतील.
असे आहेत संघ
ऑस्ट्रेलियामध्ये २०२२ साली होणारे टी२० विश्वचषकाचे आठवे पर्व असणार आहे. या स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलिया गतविजेते म्हणून उतरतील. या स्पर्धेत एकूण ४५ सामने होणार आहेत. टी२० विश्वचषक २०२२ मधील सुपर १२ फेरीसाठी यजमान ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त आयसीसीच्या टी२० क्रमवारीनुसार न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, इंग्लंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे ८ संघ थेट पात्र ठरले आहेत.
तसेच पहिल्या फेरीसाठी श्रीलंका, वेस्ट इंडिज, नामिबिया आणि स्कॉटलंड खेळतील. अन्य ४ संघ २ पात्रता स्पर्धेतून पहिल्या फेरीसाठी पात्र ठरतील.
या विश्वचषकात क्रमवारीत अव्वल ८ स्थानांवर असलेले संघ थेट सुपर १२ च्या फेरीत खेळतील. तर अन्य ८ संघांमध्ये पहिली फेरी पार पडेल. त्यातील ४ संघ (प्रत्येक गटातील अव्वल २ संघ) सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. या फेरीत १२ संघांची २ गटात विभागणी केली आहे. म्हणजे प्रत्येक गटात ६ संघ असतील.
आयसीसीने जाहीर केलेल्या गटवारीनुसार सुपर १२ फेरीसाठी इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांचा ‘गट एक’ मध्ये समावेश आहे, तर भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगदेश ‘गट दोन’ मध्ये आहेत. या दोन्ही गटात पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे प्रत्येकी २ संघ सामील होतील.
सुपर १२ च्या फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी एकमेकांसमोर येतील.
पहिली फेरी
पहिली फेरी १६ ते २१ ऑक्टोबर दरम्यान पार पडेल. यामध्ये पहिल्या फेरीत श्रीलंका आणि नामिबिया गट अ मधून खेळतील, तर वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड गट ब मधून खेळतील. ही फेरी होबार्टच्या बेलेरिव्ह ओव्हल आणि गिलाँगच्या कार्डिनिया पार्क येथे पार पडेल. यानंतर २२ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान सुपर १२ फेरी पार पडेल.
बाद फेरीचे सामने
सुपर १२ च्या फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी एकमेकांसमोर येतील.
या टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाईल. त्यापूर्वी ९ आणि १० नोव्हेंबर २०२२ रोजी अनुक्रमे सिडनी क्रिकेट ग्राऊंड आणि ऍडलेड ओव्हलवर उपांत्य सामने पार पडतील.
सामन्यांची ठिकाणे
ही स्पर्धेतील सामन्यांचे ऍडलेड, ब्रिस्बेन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या ७ शहरांमध्ये आयोजन केले जाणार आहे. तसेच होबार्टचे बेलेरिव्ह ओव्हल, गिलाँगचे कार्डिनिया पार्क, ऍडलेडमधील ऍडलेड ओव्हल, ब्रिस्बेनमधील द गॅबा, पर्थमधील पर्थ स्टेडियम, सिडनीतील सिडनी क्रिकेट ग्राऊंड आणि मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड या ७ स्टेडियमवर हे सामने होतील.
कोरोनामुळे पुढे ढकलली होती स्पर्धा
यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये २०२० साली टी२० विश्वचषक स्पर्धा होणार होती. पण, कोरोनाच्या प्रभावामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आणि २०२२ साली ऑस्ट्रेलियामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
असे आहे भारताचे टी२० विश्वचषक २०२२ मधील वेळापत्रक
पहिली फेरी –
१६ ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध नामिबिया, गिलाँग
१६ ऑक्टोबर – पात्रता फेरीतील दुसरा संघ विरुद्ध पात्रता फेरीतील तिसरा संघ, गिलाँग
१७ ऑक्टोबर – वेस्ट इंडीज विरुद्ध स्कॉटलंड, होबार्ट
१७ ऑक्टोबर – पात्रता फेरीतील पहिला संघ विरुद्ध पात्रता फेरीतील चौथा संघ, होबार्ट
१८ ऑक्टोबर – नामिबिया विरुद्ध पात्रता फेरीतील तिसरा संघ, गिलाँग
१८ ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध पात्रता फेरीतील दुसरा संघ, गिलाँग
१९ ऑक्टोबर – स्कॉटलंड विरुद्ध पात्रता फेरीतील चौथा संघ, होबार्ट
१९ ऑक्टोबर – वेस्ट इंडिज विरुद्ध पात्रता फेरीतील पहिला संघ, होबार्ट
२० ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध पात्रता फेरीतील तिसरा संघ, गिलाँग
२० ऑक्टोबर – नामिबिया विरुद्ध पात्रता फेरीतील दुसरा संघ, गिलाँग
२१ ऑक्टोबर – वेस्ट इंडिज विरुद्ध पात्रता फेरीतील चौथा संघ, होबार्ट
२१ ऑक्टोबर – स्कॉटलंड विरुद्ध पात्रता फेरीतील पहिला संघ, होबार्ट
सुपर १२ फेरी –
२२ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, सिडनी
२२ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान, पर्थ
२३ ऑक्टोबर – अ गटातील अव्वल संघ विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, होबार्ट
२३ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न
२४ ऑक्टोबर – बांगलादेश विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, होबार्ट
२४ ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, होबार्ट
२५ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, पर्थ
२६ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, मेलबर्न
२६ ऑक्टोबर – न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान, मेलबर्न
२७ ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, सिडनी
२७ ऑक्टोबर – भारत विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, सिडनी
२७ ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, पर्थ
२८ ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, मेलबर्न
२८ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न
२९ ऑक्टोबर – न्यूझीलंड विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, सिडनी
३० ऑक्टोबर – बांगलादेश विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, ब्रिस्बेन
३० ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, पर्थ
३० ऑक्टोबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ
३१ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, ब्रिस्बेन
१ नोव्हेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, ब्रिस्बेन
१ नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, ब्रिस्बेन
२ नोव्हेंबर – ब गटातील अव्वल संघ विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, ऍडलेड
२ नोव्हेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश, ऍडलेड
३ नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सिडनी
४ नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, ऍडलेड
४ नोव्हेंबर – ऑस्ट्रलिया विरुद्ध अफगाणिस्तान, ऍडलेड
५ नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, सिडनी
६ नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, ऍडलेड
६ नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, ऍडलेड
६ नोव्हेंबर – भारत विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, मेलबर्न
बाद फेरी –
९ नोव्हेंबर – पहिला उपांत्य सामना, सिडनी
१० नोव्हेंबर – दुसरा उपांत्य सामना, ऍडलेड
१३ नोव्हेंबर – अंतिम सामना, मेलबर्न
महत्त्वाच्या बातम्या –
“स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे…” बीबीएल पदार्पणानंतर उन्मुक्त झाला भावूक
पुजारा-रहाणेचे ‘बुरे दिन’ सुरू! संघातील जागा तर जाणारच सोबत आर्थिक नुकसानही पक्के