ऍडलेड येथे चालू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस अत्यंत रोमांचक राहिला. या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांनी मिळून भारतीय संघाला सळो की पळो करून सोडले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघापेक्षा ५३ धावांनी आघाडीवर असलेला भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांवर संपला. दरम्यान एकही खेळाडू दोन आकडी धावसंख्या करू शकला नाही. ही भारतीय संघाची कसोटीतील आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या होती.
भारतीय संघाच्या कसोटी डावातील सर्वात कमी धावा
यापूर्वी १९७४ साली इंग्लंडविरुद्ध भारताने सर्वात कमी धावा केल्या होत्या. लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या त्या कसोटी सामन्यातील एका डावात भारतीय संघ केवळ ४२ धावांवर गारद झाला होता, तर १९४७ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि १९५२ मध्ये इंग्लंडविरुद्ध एका डावात प्रत्येकी ५८ धावा केल्या होत्या. इतकेच नव्हे, तर दक्षिण आफ्रिका संघानेही भारताला केवळ ६६ धावांवर सर्वबाद करण्याचा पराक्रम केला होता.
ऑस्ट्रेलियाची सर्वात कमी धावसंख्याही भारताच्या बरोबरीची
असे असले, तरी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात सर्वात कमी धावा करणाऱ्या संघांच्या यादीत भारताचा पाचवा क्रमांक लागतो. या नकोशा विक्रमाच्या यादीत न्यूझीलंड संघ अव्वलस्थानी आहे. १९५५मध्ये ऑकलँड येथे झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने त्यांना २६ धावांवर गारद केले होते.
आश्चर्याची बाब म्हणजे, ऍडलेड कसोटी सामन्यात ३६ धावांवर भारताचा दुसरा डाव गुंडाळणाऱ्या ऑस्ट्रेलियावरही ही परिस्थिती आली होती. १९०२ साली बर्मिंगहम येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलिया संघ फक्त ३६ धावा करु शकला होता.
भारताची आतापर्यंतची कसोटी डावातील सर्वात कमी धावसंख्या
३६ धावसंख्या- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (ऍडलेड, २०२०)*
४२ धावसंख्या- भारत विरुद्ध इंग्लंड (लॉर्ड्स, १९७४)
५८ धावसंख्या- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (ब्रिसबेन, १९४७)
५८ धावसंख्या- भारत विरुद्ध इंग्लंड (मॅनचेस्टर, १९५२)
६६ धावसंख्या- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (डर्बन, १९९६)
महत्त्वाच्या बातम्या-
“दुसऱ्या कसोटी सामन्यात नका देऊ संधी”, पृथ्वी शॉच्या फ्लॉप खेळीला पाहून वैतागले समालोचक
ऍडलेड कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना घाम फोडणाऱ्या अश्विनने सांगितला यशाचा मंत्र