पुणे : ब्रातिस्लावा (स्लोव्हाकिया) येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय यूथ मिनीफुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय मिनीफुटबॉल संघटनेच्या १५ वर्षांखालील संघाला रौप्यपदक मिळाले. भारताचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक ठरले.
या स्पर्धेत भारताच्या पंधरा वर्षांखालील गटाने चमकदार कामगिरी केली. भारतीय संघाने उपांत्य फेरीत रोमानियाला १-० ने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. यात लढतीच्या दुसऱयाच मिनिटाला अनिरुद्ध बोहराने गोल केला. हा गोल निर्णायक ठरला. भारताचा गोलकीपर रेहान मुझ्झफर वझिदारने भक्कम बचाव करून रोमानियाला रोखले. यानंतर भारतीय संघाची अंतिम लढतीत यजमान स्लोव्हाकिया संघीशी गाठ पडली. स्लोव्हाकियाने भारतावर ३-० ने विजय मिळवला. त्यामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या रेहानला सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा पुरस्कार मिळाला. अनिरुद्ध बोहरा आणि कर्णधार अनिल पॅट्रो यांना १५ वर्षांतील गटात सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार मिळाला.
भारताचे ११ आणि १३ वर्षांखालील संघ पात्रता फेरीत दाखल झाले होते. मात्र, त्यांना मुख्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. ११ वर्षांखालील गटातील आदित्य सर्वेय, मंत्र वसानी, केविन मुरलीवरन यांना सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार मिळाला. १३ वर्षांखालील गटात आरव सेजवाल, हरविजयसिन्ह जडेजा, रजत जगताप यांना गौरविण्यात आले. भारतीय संघाला तरुण मेहरा, यशवंत मोकाशी आणि कार्तिक वशिष्ठ या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. विठ्ठल शिरगावकर आणि पीटर क्रालिक यांनी तळागाळातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखविण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
जागतिक मिनीफुटबॉल संघटनेच्या मान्यतेने स्लोव्हाकिया मिनीफुटबॉल संघटनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ११ , १३ आणि १५ वर्षांखालील गटात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विविध देशांच्या १६ संघांनी सहभाग नोंदविला होता. भारतीय संघ ११ , १३ आणि १५ या तिन्ही गटांत सहभागी झाले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय मिनीफुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीद्वारे भारतीय संघाची या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.
रौप्यपदक विजेता पंधरा वर्षांखालील भारतीय संघ – भूवन पॅट्रो (कर्णधार), तन्मय भट्टड, आर्यन उपाध्याय, रेहान मुझ्झफर वझिफदार, अनिरुद्ध बोहरा, शिवम थोरात, दीप गिरी, दक्ष अगरवाल, आदित्य साधू, धरमेश अय्यर, युग गोर, अरमान सिंग बाजवा (Indian team’s silver medal! Historic performance of Minifootball Association in Youth Minifootball Championship)
महत्वाच्या बातम्या –
INDvsWI । जयस्वालपासून ते बिश्नोईपर्यंत; रोहितच्या अनुपस्थितीत ‘यांना’ संधी, प्रमुख दावेदार मात्र बाहेरच
‘मी आजही खेळू शकतो…’, विराटचं नाव घेत कमबॅकविषयी काय म्हणाला डिविलियर्स