आज (18 फेब्रुवारी) भारत महिला संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघात आयसीसी महिला टी20 विश्वचषकाचा सराव सामना पार पडला. भारतीय महिला संघाने हा सामना 2 धावांनी जिंकला. या सामन्यात भारताची फिरकीपटू पूनम यादवने 3 विकेट्स घेत संघाच्या विजयात मोठा हातभार लावला आहे.
प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला संघाने निर्धारित 20 षटकात 8 बाद केवळ 107 धावा केल्या. तसेच, विंडिज संघाला 108 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करत विंडीज महिला संघाला 20 षटकात 7 बाद 105 धावाच करता आल्या.
पूनमने 4 षटकात 20 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. 13व्या षटकात विंडीज महिला संघ 1 बाद 57 धावा अशा चांगल्या स्थितीत होता. परंतु, दिप्ती शर्माने विंडीजची सलामीवीर फलंदाज ली-एन किर्बीला (42) त्रिफळाचीत केले. तिथून विंडीज संघाचा संपूर्ण डाव पलटला.
त्यानंतर विंडीज महिला संघाची कर्णधार स्टेफनी टेलर (16) धावबाद झाली. पुढे चेडिन नेशन (Chedean Nation) शून्य तर डिएंड्रा डोटिन (Deandra Dottin) केवळ 1 धाव घेत झेलबाद झाली. त्यामुळे विंडीजची आवस्था 17 षटकात 5 बाद 67 धावा अशी झाली होती.
पण नंतर विंडीज संघाची फलंदाज हेली मैथ्यूज (Hayley Matthews) (25) आणि चिनले हेनरीने (Chinelle Henry) (17) चांगली लढत देत विंडीजचे आव्हान कायम ठेवले. या दोघींनी मिळून 19व्या षटकात 3 चौकार आणि 1 षटकारांसह 19 धावा काढल्या. त्यामुळे विंडीजला विजयासाठी शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती.
अंतिम षटकात पूनमच्या तिसऱ्या चेंडूवर हेनरीने चौकार मारला. परंतु, चौथ्या चेंडूवर मैथ्यूज झेलबाद झाली. पुढे शेवटच्या चेंडूत 3 धावांची आवश्यकता होती. मात्र, भारताच्या वेदा कृष्णमूर्तिने हेनरीचा झेल पकडला आणि तिला बाद केले. त्यामुळे भारताने हा सामना 2 धावांची जिंकला.
भारताकडून गोलंदाजी करताना पूनमव्यतिरिक्त हरमनप्रीत कौर, दिप्ती शर्मा आणि शिखा पांडेने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना भारताला चांगली कामगिरी करता आला नाही. भारतीय महिला संघाने 4.1 षटकात 3 बाद अवघ्या 17 धावा केल्या होत्या. सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधनाने 6 चेंडूत केवळ 4 धावा केल्या. तर, जेमिमा रोड्रिगेज (Jemimah Rodrigues) शून्यावरच झेलबाद झाली. भारताची युवा फलंदाज शेफाली वर्मादेखील 2 चौकार मारत झेलबाद झाली.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि वेदाने अनुक्रमे 11 आणि 5 धावा केल्या. तर, दिप्तीनेही केवळ 21 धावा केल्या. याचबरोबर, खालच्या फळीतील फलंदाज पूजा वस्त्रकार (13) आणि तानिया भाटिया (10)ने 13 धावांची भागिदारी केली. तर, शिखा पांडेने 16 चेंडूत नाबाद 24 धावा करत भारतीय संघाला 107 धावसंख्या उभारण्यास हातभार लावला. यावेळी तिने 3 चौकार आणि 1 षटकार मारला.
विंडीजकडून गोलंदाजी करताना शामिलिया कोनेल आणि अनिसा मोहम्मदने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. चिनले हेनरी, ऍफी फ्लेचर, स्टिफनी टेलर आणि आलिया एलेनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.






