भारतात सध्या कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. दिवसेंदिवस भारतातील रुग्णसंख्या वाढतेच आहे. या परिस्थितीत सगळेच नागरिक आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले होते.
तसेच रक्तदान करण्याचे देखील आवाहन केले होते. त्याच्या याच आवाहनाला प्रतिसाद देत एका महिला क्रिकेटपटूने देखील पुढाकार घेत रक्तदान केले आहे. ही महिला क्रिकेटपटू म्हणजे पुण्याची युवा खेळाडू तेजल हसबनिस.
लसीकरणाआधी केले रक्तदान
भारत सरकारने १ मेपासून १८ ते ४५ वर्षीय वयोगटातील लोकांसाठी लसीकरण जाहीर केले. मात्र लस घेतल्यानंतर पुढील काही दिवस रक्तदान करणे, शक्य नसते. त्यामुळे लसीकरण सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच रक्ताचा साठा अपुरा पडण्याची शक्यता होती. हेच लक्षात घेऊन लस घेण्याआधी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. सचिन तेंडुलकरने देखील रक्तदान तसेच कोरोनातून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले होते.
याच आवाहनाला प्रतिसाद देत महिला क्रिकेटपटू तेजल हसबनिस हिने रक्तदान केले आहे. याची माहिती तिने सोशल मिडीयावर पोस्ट करत दिली. तिने पुण्यातील एका ठिकाणी रक्तदान करत आपले सामाजिक दायित्व पार पाडले. तसेच इतरांना देखील लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याचे इतरांना आवाहन केले आहे.
तेजल हसबनिसची कारकीर्द
तेजल हसबनिस ही २३ वर्षीय युवा महिला क्रिकेटपटू असून ती गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या रणजी संघाची अविभाज्य भाग आहे. गेली काही वर्षे तिने सातत्याने महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघाकडून खेळतांना तसेच २३ वर्षांखालील संघाकडून खेळतांना उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
तेजल उजव्या हाताने आक्रमक फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच प्रमाणे ती उपयुक्त ऑफस्पिन गोलंदाजी देखील करते. तिने महाराष्ट्राकडून खेळतांना केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ म्हणून भारतीय अ संघाकडून खेळण्याची संधी देखील तिला २०१९ साली मिळाली होती.
महत्वाच्या बातम्या:
काईल जेमिसनने नेटमध्ये विराटला गोलंदाजी करण्यास दिला नकार, हे होते मोठे कारण