अटल बिहारी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यामध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२१ मार्च) पार पडला. या सामन्यात विजय मिळवत दक्षिण आफ्रिका महिला संघाने मालिकेत २-० ने पुढाकार घेतला आहे. एकीकडे या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला; तर दुसरीकडे युवा गोलंदाज राधा यादव हिने नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय महिला संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. वनडे मालिका ४-१ ने गमावल्यानंतर, टी-२० मालिकेत देखील भारतीय संघ २-० ने पिछाडीवर आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाची युवा फिरकीपटू राधा यादव हिने महिला टी-२० क्रिकेटमध्ये सलग २५ डावात किमान एक तरी गडी बाद करण्याचा विश्वविक्रम केला आहे.
यासोबतच ती टी-२० क्रिकेटमध्ये ५० गडी बाद करणारी तिसरी सर्वात युवा गोलंदाज बनली आहे. हा कारनामा तिने आपल्या ३६ व्या टी-२० सामन्यात केला आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात लीजेल लीला आपल्याच चेंडूवर झेल टिपत तिने हा कारनामा केला आहे. राधाने २० वर्ष ३३४ दिवस घेत हा विक्रम केला आहे.
सर्वात कमी वयात ५० गडी बाद करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत सर्वोच्चस्थानी बांगलादेश संघाची खेळाडू नाहीदा अख्तर आहे. तिने ठीक २० वर्षातच हा कारनामा आपल्या नावावर केला होता. तर दुसऱ्या स्थानी इंग्लंड संघाची महिला खेळाडू सोफी एक्लेस्टोन आहे. तिने हा कारनामा २० वर्ष आणि ३०० दिवस वय असताना केला होता. सोफीने आतापर्यंत ४२ सामन्यात ६१ गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दिग्गज शेवटी दिग्गजचं असतो! रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सेहवागचे वादळ, प्रदर्शनावर टाका एक नजर
अनुष्काच्या कुशीत लाडकी लेक अन् विराटच्या हाती सामानाचं ओझं, पाहा पुणे विमनातळावरील फोटो
वनडेत इंग्लंडविरुद्ध ‘या’ भारतीय दिग्गजाने घातलाय धावांचा रतीब, विराट-रोहित आहेत खूपच दूर