भारतीय महिला संघाने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात सफाईदार विजय मिळवला. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचे चार बळी आणि स्मृती मंधाना-पूनम राऊत यांचे अर्धशतक या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ९ गडी राखून धूळ चारली. यासह तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्यात देखील यश मिळवले.
झुलन गोस्वामीची कमाल
पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून दारूण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या भारतीय संघावर या सामन्यात पुनरागमन करून तीन सामन्यांच्या मालिकेत आव्हान कायम राखण्याचे लक्ष्य होते. याच ध्येयाने मैदानात उतरलेल्या मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी हा कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भेदक गोलंदाजीचा नमुना पेश केला.
दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला फार काळ खेळपट्टीवर स्थिरावण्याची संधी भारतीय गोलंदाजांनी दिली नाही. त्यांनी नियमित अंतराने फलंदाज बाद केल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या १५७ धावांवर संपुष्टात आला. झुलन गोस्वामीने या डावात १० षटकात ४२ धावा देत ४ बळी पटकावले. तिला डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने ३ तर वेगवान गोलंदाज मानसी जोशीने २ बळी घेत सुयोग्य साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून लारा गूडॉलने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली.
स्मृती मंधाना-पूनम राऊतची नाबाद भागीदारी
विजयासाठी १५८ धावांचे लक्ष्य मिळालेल्या भारताची सुरुवात फार चांगली झाली नाही. सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्ज संघाच्या २२ धावा झाल्या असतांनाच तंबूत परतली. मात्र त्यानंतर स्मृती मंधाना आणि पूनम राऊतने सामन्याची सूत्रे हातात घेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्यांच्या दुसऱ्या विकेटसाठीच्या अभेद्य भागीदारीमुळे २८.४ षटकातच भारताने निर्धारित लक्ष्य पूर्ण केले. यात स्मृतीने ६४ चेंडूत ८० धावांची तर पूनम राऊतने ८९ चेंडूत ६२ धावांची खेळी उभारली.
या सामन्यात दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन करणाऱ्या झुलन गोस्वामीलाच सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या विजयासह भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता मालिकेचा निर्णय १२ मार्च रोजी खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यानंतर स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या:
ऐकलंत का मंडळी! शाहिद आफ्रिदीची मुलगी आहे लईच देखणी, लाईमलाईटपासून ठेवते स्वत:ला दूर
आयसीसी महिला टी२० क्रमवारीत शेफाली वर्माची प्रगती, तर या भारतीय खेळाडूंची घसरण
अबब! वनडेत २३१ च्या फलंदाजी सरासरीने कुटल्या धावा, ही खेळाडू यंदा ठरली प्लेअर ऑफ द मंथ