भारतीय महिला क्रिकेट संघ आणि पुरुष क्रिकेट संघ सध्या मुंबईमध्ये विलगिकरणाचा कालावधी पूर्ण करत आहेत. हा कालावधी संपल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात हे दोन्ही संघ इंग्लंडच्या दिशेने रवाना होणार आहेत. या दौऱ्यावर पुरुष क्रिकेट संघाला न्यूझीलंड संघाविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. तर महिला क्रिकेट संघाला ३ टी -२० आणि ३ वनडे सामन्यांसह एकमात्र कसोटी सामना खेळायचा आहे. या कसोटी सामन्यापूर्वी, कर्णधार मिताली राजने आपले मत मांडले आहे.
येत्या १६ जून पासून भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यातील एकमात्र कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतीय महिला संघाचा ७ वर्षातील हा पहिला कसोटी सामना आहे.
तत्पूर्वी, झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मिताली राज म्हणाली की, “तुम्ही त्यांना (पुरुष क्रिकेटपटूंना) प्रश्न विचारू शकता आणि ते मदत करू शकतात. कारण अनेक असे युवा (महिला) खेळाडू आहेत जे पहिल्यांदा कसोटी सामना खेळणार आहेत. अशातच महिला खेळाडूंनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांचा या दौऱ्यावरील अनुभव जाणून घेतला तर हे नक्कीच फायदेशीर ठरू शकते.”
भारतीय महिला संघ तब्बल सात वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ब्रिस्टॉलमध्ये एकमात्र कसोटी सामना झाल्यानंतर भारतीय संघाला ३ टी -२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका देखील खेळायची आहे.
तसेच मिताली राज पुढे म्हणाली, “मला वाटते की, कसोटी क्रिकेट खेळणे खूप चांगले आहे. ते मायदेशात असो किंवा परदेशात. जर असेच सुरू राहिले तर आणखी चांगले होईल. कारण यामुळे खेळाडूंना खूप मदत होते. कधी कधी मैदानात जाऊन कुठल्याही दबावशिवाय खेळणे आणि परिस्थितीचा आनंद घेणे चांगले असते. हे पहिल्यांदा कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी ही उत्तम संधी असेल. जे खेळाडू २०१४ मध्ये कसोटी संघात होते, त्यांना आपले अनुभव इतर खेळाडूंसोबत शेअर करता येऊ शकतात.”
तसेच ती पुढे म्हणाली की, “मला असे वाटते की, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळायला मिळणार आहे. ज्यामुळे युवा खेळाडूंना खूप काही शिकण्याची संधी मिळू शकते. या खेळाडूंसाठी ही चांगली वेळ आहे.”
तसेच झुलन गोस्वामीबद्दल बोलताना ती म्हणाली की, “हे महत्वाचे असणार आहे की, तिला खेळायची संधी मिळायला हवी. तिला मैदानात अधिकाधिक वेळ घालवण्याची आवश्यकता आहे. सर्वात अनुभवी खेळाडू असल्यामुळे तिने परिस्थिती हाताळणे गरजेचे आहे. ”
महत्त्वाच्या बातम्या –
अंडी खाण्यामुळे निशाण्यावर आलेल्या विराटने ट्रोल करणाऱ्यांना ‘असे’ दिले प्रतिउत्तर
“इंग्लंड संघाला कुठल्याही परिस्थितीत आपला रवींद्र जडेजा शोधण्याची गरज आहे”
कोरोनाविरुद्धच्या लढाईत युवराज सिंगचाही हातभार; राबवणार ‘हा’ मोठा उपक्रम