आगामी 4 ऑक्टोंबरपासून युएईमध्ये महिला टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय सामन्यांना सुरूवात होणार आहे. त्याआधी सराव सामने खेळवले जात आहेत. भारतीय महिला संघानेही रविवारी पहिला सराव सामना खेळला. ज्यामध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 20 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 141 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या महिला संघाला 8 गडी गमावून केवळ 121 धावा करता आल्या. आशाप्रकारे भारतीय संघाने सामना जिंकला.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. टाॅप ऑर्डर केवळ 23 धावांत 3 गडगडला. सलामीवीर शेफाली वर्मा 7 धावा तर स्मृती मानधना 14 धावा करून बाद झाली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरही केवळ 1 धावा करून बाद झाली. त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि यास्तिका भाटिया यांनी डाव सांभाळला. रॉड्रिग्जने 40 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. यास्तिका भाटियाने 25 चेंडूत 24 धावा केल्या. त्यामुळे संघाला 141 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले.
लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने केवळ 13 धावांत 3 विकेट गमावल्या. यानंतर शिनेल हेन्रीने मधल्या फळीत डावाची धुरा सांभाळली. हेन्रीने 48 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 59 धावांची खेळी केली. मात्र तिला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. एफी फ्लेचरने खालच्या क्रमाने 21 धावा केल्या पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. याच कारणामुळे वेस्ट इंडिज संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाकडून पूजा वस्त्राकरने 4 षटकात 1 मेडनसह 20 धावांत 3 बळी घेतले. याशिवाय दीप्ती शर्मानेही 3 षटकांत 11 धावा देत 2 बळी घेतले.
हेही वाचा-
IRE vs SA: आयर्लंडची ऐतिहासिक कामगिरी; दक्षिण आफ्रिकेची शरणागती
निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी; ट्रॅव्हिस हेडचा इंग्लंडला दणका, मालिका खिश्यात
“ना ना म्हणत 10 हंगाम खेळेल”, धोनीच्या निवृत्तीबाबत केकेआरचा संघमालक शाहरुखचे मजेशीर विधान