---Advertisement---

श्रीलंकेविरुद्धचा दुसऱ्या वनडेतील विजय टीम इंडियासाठी ‘विश्वविक्रमी’; ऑस्ट्रेलियाला पछाडत ‘या’ यादीत पटकावले अव्वल स्थान

On: बुधवार, जुलै 21, 2021 1:42 AM
---Advertisement---

कोलंबो। भारताने मंगळवारी (२० जुलै) श्रीलंकेविरुद्ध आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात ३ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी देखील भारतीय संघाने घेतली आहे. याबरोबरच एक खास विक्रम भारतीय संघाच्या नावावर नोंदवला गेला आहे.

भारतीय संघाचा मोठा विश्वविक्रम 
भारताचा वनडेतील श्रीलंकेविरुद्धचा हा एकूण ९३ वा विजय होता. त्यामुळे वनडेत एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत भारत अव्वल क्रमांकावर आला आहे. भारताने या यादीत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध, तर पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध वनडेत प्रत्येकी ९२ विजय मिळवले आहेत.

भारताने श्रीलंकेविरुद्ध आत्तापर्यंत १६१ वनडे सामने खेळले आहेत. यातील ९३ सामन्यांत भारताला विजय प्राप्त झाला आहे, तर ५६ सामन्यांत भारताने पराभव स्विकारला आहे. तसेच १ सामना बरोबरीत सुटला असून ११ सामन्यांचा निकाल लागलेला नाही. (India’s 93rd win against Sri Lanka in ODIs)

वनडेत एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे संघ 
९३ विजय – भारत विरुद्ध श्रीलंका (१६१ सामने)
९२ विजय – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (१३८ सामने)
९२ विजय – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (१५५ सामने)
८४ विजय – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (१५२ सामने)
८० विजय – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (१४३ सामने)
७४ विजय – ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज (१४१ सामने)

श्रीलंकेविरुद्ध दीपक चाहरची अष्टपैलू कामगिरी 
मंगळवारी श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी २७६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमारने यादव आणि दीपक चाहरने अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमारने ४४ चेंडूत ६ चौकारांसह ५३ धावा केल्या. तसेच दीपक चाहरने ८२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ६९ धावा केल्या.

याशिवाय भारताने १९३ धावांवर ७ विकेट्स गमावल्या असताना चाहरने भुवनेश्वर कुमारसह ८ व्या विकेटसाठी नाबाद ८४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळे भारताने ४९.१ षटकात ३ विकेट्स राखून विजय मिळवला. भुवनेश्वर १९ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो आणि चरिथ असलंका यांनी अर्धशतके झळकावली. फर्नांडोने ५० धावांची आणि असलंकाने ६५ धावांची खेळी केली. याशिवाय चमिका करुणारत्नेने नाबाद ४४ धावांची खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेने ५० षटकांत ९ बाद २७५ धावा केल्या. भारताकडून युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच दीपक चाहरने २ विकेट घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

दीपक-भुवनेश्वरच्या जोडीचा मोठा पराक्रम! नाबाद ८४ धावांच्या भागीदारीसह ‘या’ विक्रमाच्या यादीत मिळवला दुसरा क्रमांक

अर्धशतक एक विक्रम अनेक! दीपक चाहरने नाबाद अर्धशतकी खेळीसह चार मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

मोठी बातमी! इंग्लंड दौऱ्यावरील पहिल्या सराव सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जखमी; न्यावे लागले हॉस्पिटलमध्ये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---