---Advertisement---

पाकिस्तानविरुद्ध झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळलेले ११ भारतीय, आज असतात तरी कुठे?

On: शुक्रवार, मे 14, 2021 4:36 PM
---Advertisement---

गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. याआधी भारत आणि पाकिस्तानमध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये खेळवण्यात आली होती. पण त्यावेळी भारत दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तान संघाविरुद्ध केवळ वनडे आणि टी20 मालिका झाली होती. त्या दौऱ्यात कसोटी मालिका झाली नव्हती.

मागील काही वर्षांत भारत आणि पाकिस्तान या दोन देशात असलेल्या राजकीय तणावामुळे या दोन्ही देशांचे संघ द्विपक्षीय मालिका खेळलेले नाही. हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात.

विशेष म्हणजे या दोन संघात शेवटची कसोटी मालिका 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 ला खेळवण्यात आली होती. त्यावेळी अनिल कुंबळे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होता. तसेच पाकिस्तान 5 वनडे आणि 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी 3-2 अशा फरकाने वनडे मालिका भारताने जिंकली होती. तर कसोटी मालिका भारताने 1-0 ने जिंकली होती.

कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. तर अन्य दोन सामने अनिर्णित राहिले होते. त्यावेळीचा तो कसोटी मालिका विजय कुंबळेचा भारताचा कर्णधार म्हणून पहिला मालिका विजय होता. तसेच सौरव गांगुली हा त्या मालिकेत मालिकावीर ठरला होता.

या मालिकेतील 8 ते 12 डिसेंबर दरम्यान बंगळुरुला झालेला शेवटचा कसोटी सामना हा मागील 13 वर्षांतील भारत-पाकिस्तान संघातील शेवटचा कसोटी सामना देखील ठरला. त्या सामन्यात भारतीय संघाकडून खेळलेल्या 11 खेळाडूंपैकी 3 खेळाडूंनी अजून निवृत्ती स्विकारलेली नाही. तर केवळ 1 खेळाडू भारताच्या कसोटी संघातील नियमित सदस्य आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळलेले 11 भारतीय खेळाडू सध्या काय करतात, याचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे. 

1. वासिम जाफर – भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वासिम जाफरने त्या सामन्यात सलामीला फलंदाजी करताना पहिल्या डावात 17 आणि दुसऱ्या डावात 18 धावा केल्या होत्या. जाफरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द तशी फारशी नंतर बहरली नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र जाफरने अनेक विक्रम केले. अनेकदा मोठ्या खेळी केल्या. तो रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे. त्याने रणजी ट्रॉफी या मानाच्या स्पर्धेत १२ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने नुकतीच मार्च 2020 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो प्रशिक्षण क्षेत्रात उतरणार असल्याची चर्चा आहे.

2. गौतम गंभीर- जाफरबरोबर पाकिस्तान विरुद्धच्या शेवटच्या कसोटीत सलामीला फलंदाजी गौतम गंभीरने केली होती. त्याने या सामन्यात पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 3 धावांची खेळी केली होती. पण तो या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला असला तरी पुढे काही वर्षे भारतीय संघाचा नियमित सदस्य होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत 58 कसोटी सामने खेळले. यात त्याने 4 हजारांहून अधिक धावाी केल्या.

गंभीरने डिसेंबर 2018 मध्ये सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर गंभीरने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. तो सध्या उत्तर दिल्लीचा खासदार आहे.

3. राहुल द्रविड –  भारतीय क्रिकेट संघाची भिंत अशी ओळख मिळवलेला राहुल द्रविड त्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळला होता. त्याने त्या सामन्यात 19 आणि 42 अशा खेळी केल्या होत्या. या सामन्यानंतरही द्रविड 2012 पर्यंत नियमितपणे भारतीय संघाकडून खेळत होता. द्रविडने 2012 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

द्रविडचे भारतीय क्रिकेटमधील योगदान मोठे राहिले आहे. त्याने अनेकदा भारतीय संघाकडून उत्तम खेळी केल्या आहेत. 164 कसोटी सामने खेळलेल्या द्रविडने निवृत्ती नंतर प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा मार्गदर्शक होता. तसेच त्याने 19 वर्षांखालील भारतीय संघाचेही प्रशिक्षकपद स्विकारले.

त्याच्या मार्गदर्शनाखाली 2016 ला 19 वर्षांखालील भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तर 2018 ला 19 वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषकही जिंकला होता. याचवेळी द्रविडने भारत अ संघाचेही प्रशिक्षकपद भूषवले. सध्या द्रविड बंगळुरुमध्ये असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे.

4. सौरव गांगुली – भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसाठी 2007 ची पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिका शानदार ठरली होता. त्याने या मालिकेतील शेवटच्या सामन्यातही अफलातून कामगिरी केली होती. त्याने पहिल्या डावात 239 धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात 91 धावांची खेळी केली होती. तसेच 1 विकेटही घेतली होती. त्यामुळे त्याला त्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता.

या सामन्यानंतर गांगुलीने 1 वर्षाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण तरीही तो आयपीएलमध्ये सक्रिय होता. पण 2012 नंतर त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्ती नंतर क्रिकेट प्रशासनाचा मार्ग गांगुलीने निवडला. तो 4 वर्षे बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होता. सध्या तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चा अध्यक्ष आहे.

5. व्हीव्हीएस लक्ष्मण – भारतीय कसोटी संघात व्हीव्हीएस लक्ष्मण मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज होता. पण तो पाकिस्तान विरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात मोठी कामगिरी करण्यात  अपयशी ठरला. त्याने पहिल्या डावात 5 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात तो 14 धावांवर असताना रिटायर्ड हर्ट झाला. पण या सामन्यातनंतरही लक्ष्मण 2012 पर्यंत भारतीय कसोटी संघातील नियमित सदस्य होता.

त्याने 2012 ला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर तो समालोचन क्षेत्रात उतरला. तसेच तो सध्या आयपीएलमधील सनराझर्स हैद्राबाद संघाचा मार्गदर्शकही आहे.

6. युवराज सिंग – भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराजला त्यावेळी भारताचे 4 खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने पाकिस्तान विरुद्धचा शेवटचा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानेही या संधीचा फायदा घेत पहिल्या डावात 169 धावांची दिडशतकी खेळी केली. तसंच त्या सामन्यात त्याने एकूण 2 विकेट्स घेतल्या होत्या.

पण यानंतरही युवराज भारताच्या कसोटी संघातील नियमित सदस्य राहिला नाही. पण तो मर्यादीत षटकांच्या भारतीय क्रिकेट संघाचा मात्र मुख्य सदस्य होता. त्याने 2011 च्या विश्वचषकाचे विजेतेपद भारतीय संघाला जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. पण त्याला त्यानंतर कर्करोगाने घेरले. त्याचा परिणाम त्याच्या क्रिकेटवरही झाला. तो कर्करोगाची लढाई जिंकून मैदानावर परतला पण तो त्याची जागा टिकवू शकला नाही.

अखेर त्याने 2019 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता तो जगभरातील विविध क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसतो. तसेच कर्करोगाबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी ‘यू वी कॅन’ ही संस्थाही त्याने स्थापन केली असून त्यासाठीही तो काम करताना दिसतो.

7. दिनेश कार्तिक – भारताचा त्यावेळीचा नियमित यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी पाकिस्तान विरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर पडला असल्याने त्या सामन्यात दिनेश कार्तिकला संधी मिळाली होती. कार्तिकनेही या संधीचा फायदा घेत पहिल्या डावात 24 तर दुसऱ्या डावत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच यष्टीमागे 2 झेल आणि 1 यष्टीचीत त्याने केले होते.

त्यानंतरही कार्तिक भारतीय संघात ये-जा करत राहिला. सध्या तो क्रिकेटमध्ये सक्रिय असून तमिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो तर आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे.

8. इरफान पठाण – भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण आणि पाकिस्तानमधील कट्टर प्रतिस्पर्धा सुरुवातीपासूनच चालत आली होती. इरफानने पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या कसोटीतही पहिल्या डावात 102 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच 1 विकेट त्याने घेतली होती. पण या सामन्यानंतरही इरफानची कसोटी कारकिर्द तेवढी बहरली नाही. तो 2008 ला कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला.

पण असे असले तरी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये सक्रिय होता. पण मागील सलग 3 आयपीएल मोलमात अनसोल्ड राहिल्यानंतर त्याने 2020 च्या सुरुवातीला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्यात जम्मू आणि काश्मिर संघाचा खेळाडू आणि मार्गदर्शन म्हणून सदस्य होता. तसेच निवृत्तीनंतर बऱ्याचदा तो समालोचन करताना दिसला आहे.

9. अनिल कुंबळे – पाकिस्तान विरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेत कुंबळे भारताचा कर्णधार होता. त्याने त्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शानदार कामगिरी करताना सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. त्याचप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही त्याने चांगले गोलंदाजी प्रदर्शन करताना एकूण 6 विकेट्स घेतल्या होत्या. या मालिकेनंतर 1 वर्षाने कुंबळेने निवृत्ती घेतली.

त्यानंतर तो प्रशिक्षण क्षेत्रात उतरला. त्याने भारतीय क्रिकेट संघाचे 1 वर्षे प्रशिक्षकपद सांभाळले. परंतू त्याचे भारताचा कर्णधार विराट कोहलीसह वाद झाल्याने त्याने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता त्याला आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा क्रिकेट संचालक आणि मुख्य प्रशिक्षकपदाचा भार देण्यात आला आहे. याबरोबरच तो आयसीसीच्या क्रिकेट समीतीचा अध्यक्ष देखील आहे.

10. हरभजन सिंग – 2010 च्या दशकातील भारताच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक असलेला हरभजन सिंग पाकिस्तान विरुद्धच्या शेवटच्या कसोटीत मात्र खास काही करु शकला नव्हता. त्याला केवळ 2 विकेट्स घेण्यात यश आले होते. पण तरीही तो पुढे 2011 पर्यंत भारताच्या कसोटी संघातील नियमित सदस्य होता. परंतू त्यानंतर त्याने त्याची भारतीय संघातील जागा गमावली.

पण असे असले तरी तो आयपीएलमध्ये सक्रिय असून सध्या चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहे. तसेच तो आयपीएल नसताना समालोचन करतानाही दिसतो.

11. इशांत शर्मा – 2007 ला भारतीय संघात पदार्पण केलेल्या 19 वर्षीय इशांत शर्माला त्यावेळी पाकिस्तान विरुद्धचा शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानेही त्याच्या प्रतिभेची चूणूक दाखवताना पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. इशांत तेव्हापासून भारतीय कसोटी संघाचा नियमित सदस्य राहिला आहे आणि आता तर त्याला 100 कसोटी सामने खेळण्याचा मान मिळवण्याचीही संधी आहे. त्याने आत्तापर्यंत 97 कसोटी सामने खेळले असून तो अजूनही भारतीय कसोटी संघात नियमितपणे खेळतो.

ट्रेंडिंग लेख – 

३ षटकांत शतक ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज, मारले होते तब्बल २९ चौकार

या ५ भारतीय क्रिकेटर्सचे हमशकल पाहिलेत का? पाहून तुम्हीही व्हाल दंग

कसोटीत, तेही ११ व्या क्रमांकाव फलंदाजीला येत सर्वाधिक धावा करणारे ५ क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---