पुणे। भारताने इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेला विजयाने सुरुवात केली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गंहुंजे येथे होत असलेल्या या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (२३ मार्च) भारताने ६६ धावांनी जिंकला. मात्र या सामन्यादरम्यान भारताला मोठा धक्का बसला. भारताचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर गंभीर दुखापतग्रस्त झाला.
झाले असे की या सामन्यात इंग्लंडच्या डावाच्या ८ व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने फटका खेळला. तो चेंडू आडवण्यासाठी श्रेयस अय्यरने उडी मारली. पण त्याचवेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यावेळी तो वेदनेने कळवतानाही दिसला. त्याला नंतर मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आले.
त्याच्या या दुखापतीबद्दल सामन्यादरम्यान बीसीसीआयने ट्विटरवर माहिती दिली होती की श्रेयसचा खांदा निखळला असून त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले आहे. त्यामुळे तो उर्वरित सामन्यात सहभागी होणार नाही.
श्रेयसऐवजी त्याच्या जागेवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी राखीव क्षेत्ररक्षक म्हणून शुबमन गिल आला होता.
तरी अजून स्कॅनचा रिपोर्ट काय आला, याबद्दल बीसीसीआयने अद्याप माहिती दिलेली नाही. मात्र, सध्या माध्यमांत अशी चर्चा होत आहे की साधारण ६ आठवड्यांसाठी श्रेयसला क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. तसेच जर शस्त्रक्रिया करावी लागली तर त्यापेक्षाही अधिक कालावधीसाठी त्याला क्रिकेट सामन्यांना मुकावे लागेल.
आयपीएल २०२१ च्या सामन्यांनाही मुकणार श्रेयस?
येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. श्रेयस या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करणार होता. मात्र त्याच्या दुखापतीचा विचार करता, जर श्रेयसला १ महिन्यापेक्षाही अधिक काळ जर क्रिकेटपासून दूर राहावे लागले तर तो आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातील जवळपास अनेक सामन्यांना मुकेल. त्यामुळे आता त्याची दुखापत गंभीर नसावी ही इच्छा भारतीय संघाबरोबरच दिल्ली कॅपिटल्सला देखील असेल.
रोहित शर्मा देखील पहिल्या वनडे दरम्यान दुखापतग्रस्त
पहिल्या वनडेत श्रेयसच्या आधी रोहित शर्माला देखील फलंदाजी करताना उजव्या हाताच्या कोपऱ्याला चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. पण त्याने फलंदाजी करणे कायम ठेवले होते. मात्र, त्याला नंतर वेदना जाणवत असल्याने तो देखील क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. पण त्याची दुखापत गंभीर नसल्याचे समजत आहे.
https://twitter.com/BCCI/status/1374366824293306376
पहिल्या सामन्यात भारताचा विजय –
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३१७ धावा केल्या. यावेळी भारताकडून शिखर धवन (९८), विराट कोहली (५६), केएल राहुल (६२*) व कृणाल पंड्या (५८*) यांनी अर्धशतके ठोकली. तसेच रोहितने २८ आणि श्रेयसने ६ धावांची खेळी केली. इंग्लंडसाठी गोलंदाजी करताना अष्टपैलू बेन स्टोक्सने ३ तर, मार्क वूडने २ गडी बाद केले.
त्यानंतर प्रतिउत्तरादाखल इंग्लंडला ४२.१ षटकात सर्वबाद २५१ धावाच करता आल्या. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक ९४ धावांची खेळी केली. तर जेसन रॉयने ४६ धावांची खेळी केली. अन्य फलंदाजांना फार खास काही करता आले नाही. गोलंदाजी करताना भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूरने ३ विकेट्स, भुवनेश्वर कुमारने २ आणि कृणाल पंड्याने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvENG: पहिल्या वनडेत खेळल्या २ सख्ख्या भावांच्या जोड्या; सात वर्षांनी घडला ‘हा’ योगायोग
साता जन्माच्या गाठी! नवविवाहित बुमराह दाम्पत्याचा व्हिडिओ आला सर्वांसमोर, तुम्हीही घ्या पाहून